अहमदनगरच्या अल्पवयीन मुलीवर सांगलीत अत्याचार

दोघांना भिंगार पोलिसांकडून अटक: 10 डिंसेबरपर्यंत पोलीस कोठडी
अहमदनगरच्या अल्पवयीन मुलीवर सांगलीत अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीला फूस लावून सांगली जिल्ह्यात पळून नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी अत्याचार करणार्‍या युवकासह त्याला सांगलीमध्ये मदत करणार्‍या युवकालाही अटक केली आहे. अत्याचार करणारा युवक मोहित बाबासाहेब कांबळे (वय 19) व त्याला मदत करणारा आकाश कचरू क्षेत्रे (वय 19 दोघे रा. सैनिकनगर, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कांबळे व क्षेत्रे यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांना 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी सुरूवातीला भिंगार पोलीस ठाण्यात भादंवि 363 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. यामध्ये आता अत्याचार, पोक्सो कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 1 डिसेंबर 2021 रोजी मोहित कांबळे याने अहमदनगर शहरातील एका उपनगरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी तिच्या घरच्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ करत होते. त्यांनी अल्पवयीन मुलीला पळविणार्‍या युवकाची माहिती काढली. तो सांगली जिल्ह्यात त्याच्या मित्राकडे असल्याचे उपनिरीक्षक शिरसाठ यांना माहिती मिळाली. उपनिरीक्षक शिरसाठ यांच्यासह पोलीस अंमलदार गणेश साठे, कोमल जाधव यांनी सांगली जिल्ह्यात जावून कांबळे व त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. कांबळे हा त्याचा मित्र क्षेत्रे याच्याकडे त्या अल्पवयीन मुलीला घेवून राहात होता. तेथे त्याने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला घरच्यांच्या ताब्यात दिले आहे. तर आरोपी कांबळे व क्षेत्रे दोघे पोलीस कोठडीत आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर शहर पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिरसाठ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

क्षेत्रेच्या मदतीने सांगलीत वास्तव्य

मोहित कांबळे याचा मित्र आकाश क्षेत्रे हा सांगली जिल्ह्यात मोलमजुरीच्या कामाला होता. कांबळे याने अल्पवयीन मुलीला क्षेत्रे याच्याकडे नेले. तेथे क्षेत्रे याच्या मदतीने कांबळे याने पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अत्याचार करणार्‍यासह त्याला मदत करणार्‍यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com