अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याला 10 वर्षे सक्तमजुरी

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याला 10 वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्‍या तरूणाला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी एच.मोरे यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 चे कलम सहा तसेच भादंवि कलम 376 (2) (एन) नुसार दोषी धरून 10 वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. गणेश शहाजी परकाळे (वय 30 रा. पिंप्री घुमरी ता. आष्टी जि. बीड) असे शिक्षा झालेल्या तरूणाचे नाव आहे.

सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. 13 मार्च, 2019 रोजी फिर्यादी यांची पीडित अल्पवयीन मुलगी (वय 16) हीस कोणीतरी अज्ञात इसमाने घरातून पळून नेले असल्याची फिर्याद भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी भादंवि 363 नुसार गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलगी ही 5 सप्टेंबर, 2019 रोजी भिंगार कॅम्प पोलिसांना गणेश शहाजी परकाळे याचे सोबत गोल्हेगाव (ता. शिरूर जि. पुणे) येथे मिळून आली. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पीडित मुलीचा जबाब पोलिसांनी नोंदविला. पीडित मुलीची गणेश सोबत मामाच्या गावाला ओळख झाली होती. तसेच त्याचे लग्न झाले असुन त्याला दोन मुले व एक मुलगी असल्याचे सांगितले होते.

15 ऑगस्ट, 2018 रोजी गणेशने पीडित मुलीला धमकी दिली की,‘तु जर माझ्या सोबत आली नाही तर मी तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल’. त्यानंतर 14 मार्च, 2019 रोजी गणेशने पीडित मुलीला फोन करून स्टेट बँक चौक, नगर येथे धमकी देवून बोलविले. त्यानंतर गणेश हा पीडित मुलीला घेवून सुरूवातीला बेलवंडी फाटा येथे गेला. तेथे एक खोली भाड्याने घेवून सुमारे पाच महिने ठेवले. त्या ठिकाणी गणेशने मुलीची इच्छा नसताना तिचेशी बळजबरीने शारिरीक संबंध केले. दरम्यान गणेशने पीडित मुलीला ओझर (ता. जुन्नर) येथील एका मंदीरामध्ये माळ घालून आपले लग्न झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर गणेशने पीडित मुलगीला गोल्हेगाव (ता. शिरूर जि. पुणे) येथे नेवून एका खोलीमध्ये ठेवले होते.

तेथेही त्याने पीडितीवर अत्याचार केला. यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. पीडित मुलीचा जबाब पोलिसांनी घेतल्यानंतर गणेश परकाळे विरूध्द भादंवि कलम 376 (2) (एन) तसेच पोक्सो कायदा कलम 4, 5 (2) (जे) (एल), 6, 8 नुसार वाढीव कलमान्वेय गुन्हा नोंदविण्यात आला होता. पीडितेचा जबाब नोंदविल्यानंतर तिची वैद्यकिय तपासणी केली असता, ती 16 आठवड्याची गरोदर असल्याची माहिती निदर्शनास आली. तपासाअंती तपासी अमंलदार पोलीस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी यांनी गणेश परकाळेविरूध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

18 साक्षीदार तपासले

सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे 18 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, अल्पवयीन पीडित मुलीची साक्ष, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकिय अधिकारी तसेच वयासंदर्भात महानगरपालिका अधिकारी तसेच मुख्याद्यापक, रासायनिक विश्लेषक तज्ञ यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तसेच सरकार पक्षाचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राह्यधरून आरोपी गणेश शहाजी परकाळे यास न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सदर खटल्यात पैरवी अधिकारी गोडे, राठोड-वडते, दांगोडे यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com