
राहाता |वार्ताहर| Rahata
सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन कॉलेज तरुणीला फसवून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राहाता पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीला पोक्सो कायदा अंतर्गत अटक केली.
राहाता पोलिसांत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 23 जून 2020 रोजी आरोपी सौरभ विठ्ठल कातकाडे याने माझा मोबाईल नंबर प्राप्त करून व्हॉट्सअॅप माध्यमातून मला हाय मेसेज टाकला मी त्या नंबरला रिप्लाय दिला नाही. परंतु तो रोज मला मेसेज टाकू लागल्याने मी त्याला फोन करून कोणाचा नंबर आहे असे विचारल्याने त्याने मला सौरभ विठ्ठल कातकाडे असे नाव सांगितले. त्यानंतर तो रोज माझ्याशी चॅटिंग करू लागला मी त्याला टाळाटाळ करीत होते तरी तो रोज मला मेसेज करीत होता.
तो मला फोन करू लागला. मी त्याला टाळाटाळ करीत होते. परंतु त्याने मला धमकावले तू जर मला भेटायला नाही आली तर मी तुझ्या घरी येईल असे म्हटल्याने मी घाबरले त्यामुळे मी त्याला दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी राहाता येथे भेटले. भेटल्यानंतर त्याने माझ्यासोबत फोटो काढले. नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जवळीक साधून तुझ्या टेन्शनमुळे मी गोळ्या खाल्ल्या औषध उपचारासाठी त्याने 1 लाख 37 हजार रुपये जबरदस्तीने घेतले तसंच मित्रांकडून माझा पाठलाग करून धमकावले. मी लोणी येथे कॉलेजला असल्याने त्याने मला लोणी येथे भेटण्यास बोलावले.
पण मी त्याला नकार दिल्याने त्याने मला मेसेज व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तो मला लोणी येथे जबरदस्तीने भेटायला येत होता. घरच्यांना सांगण्याची धमकी देत असल्याने मी खूप घाबरून गेले होते. सौरभ याने मला दिनांक 2 ऑगस्ट 2021 रोजी जबरदस्तीने मोटरसायकलवर बसुन लोणी येथील एका रूममध्ये नेऊन माझ्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध केले. मी घाबरले असल्यामुळे घरातील व्यक्तींना याबाबत काही सांगितले नाही. तो पुन्हा माझ्याकडे पैशाची मागणी करू लागला. पैसे दिले नाही तर तुझ्या सोबतचे फोटो व्हायरल करेल व तुझ्या तोंडावर अॅसीड फेकून मारील अशी धमकी देत होता. त्यामुळे मी घरच्यांना याबाबत सांगितले.
घरच्यांनी लोणी पोलीस स्टेशनला सौरभ कातकाडे याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद केला. माझी बदनामी होईल म्हणून मी त्यावेळी घरातील व्यक्तींना माझ्याशी शारीरिक संबंध केल्याचे सांगितले नव्हते. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो माझ्या वडिलांना मेसेज करून धमक्या देऊ लागला. त्यामुळेे माझ्या वडिलांनी व मी दिनांक 14 ऑगस्ट 21 रोजी राहाता पोलिसात तक्रार दिली होती. तरी तो वडिलांना व मला मेसेज करून धमकी देत असल्याने मी माझ्या आई-वडिलांना माझ्याबरोेबर घडलेला सर्व प्रकार सांगितला.
पीडित अल्पवयीन तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी सौरभ विठ्ठल कातकाडे वय 21 राहणार रानमळा ता. नेवासा जिल्हा अहमदनगर याच्याविरुद भादंवि कलम 376,354,385,504,507,34 प्रमाणे पोक्सो कायदा अंतर्गत बलात्कार व खंडणी चा गुन्हा दाखल करून अटक केली असून आरोपीच्या मित्रांचा पोलीस शोध घेत आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करत आहे.