अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना जन्मठेप

श्रीगोंदे येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना जन्मठेप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी भानुदास गंगाराम भिसे (रा. धारकरवाडी, चिंभळे ता. श्रीगोंदा) व नामदेव अंबु अडागळे (रा. चिंभळे) यांना श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी दोषी धरून अत्याचार कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम तीन व चार अन्वये 10 वर्षांची शिक्षा व प्रत्येकी चार हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. आरोपींना या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल पुष्पा कापसे- गायके यांनी काम पाहिले.

या घटनेतील माहिती अशी, सदर खटल्यातील आरोपी भानुदास भिसे व नामदेव अडागळे या दोघांनीही दोन शेतकर्‍यांची शेती वाट्याने घेतली होती. पीडिता एका गावामध्ये तिचे कुटुंबासह राहत होती. फिर्याद देण्याच्या पाच महिने अगोदर पीडिता घराचे पाठीमागील उसाचे पिकाकडे प्रात:विधीसाठी गेली असताना तेथे आरोपी भानुदास भिसे हा आला व त्याने तीचेवर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला व ‘तू कोणाला सांगू नको’, असा दम दिला. त्यानंतर पीडिता ही उसाच्या पिकाकडे गेली असताना, परत दोन वेळेस तिचेवर बळजबरीने अत्याचार केले.

दरम्यानचे काळात पीडिता ही घरी एकटीच असताना दुपारचे वेळेस आरोपी नामे नामदेव अडागळे घरात आला व त्याने पीडितेवर बळजबरीने शारिरीक अत्याचार केला, व ‘तु हे कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे आईला मारून टाकीन’, अशी धमकी दिली. भितीपोटी झाल्या प्रकाराबाबत पीडितेने आईला सांगितले नाही. त्यानंतर पीडिताच्या आईने मुलीच्या पोटात दुखत असल्याने तीची सोनोग्राफी केली. त्यावेळी मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समजले.

मुलीला घरी घेऊन आल्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारले असता, पीडितेने वरीलप्रमाणे घडलेली घटना सांगितली. आरोपींना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानचे काळात पीडिताने बाळाला जन्म दिला. सदर खटल्याची सुनावणी श्रीगोंदा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांच्या समोर झाली. सदर खटल्यामध्ये एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, पीडित मुलगी, डॉक्टर, ग्रामसेवक, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com