अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी

जिल्हा न्यायालयाचा निकाल || पारनेर तालुक्यातील घटना
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रवीण पोपट खरात (वय 24 रा. कारेगाव पो. पिंपळगाव रोठा ता. पारनेर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम. ए. बरालिया यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 चे कलम 4 तसेच भादंवि कलम 376 (1) नुसार दोषी धरून 10 वर्षे सक्त मजुरी व 20 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. 17 फेब्रुवारी, 2019 रोजी सायंकाळी फिर्यादी हे गोठ्यात गाईचे दुध काढत असताना त्यांची मुलगी उलटी करीत होती. त्यामुळे फिर्यादी हे तिला घेवून पारनेर तालुक्यातील एका गावातील हॉस्पिटलमध्ये गेले. तेथून शिरूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे गेल्यानंतर मुलीने काहीतरी विषारी औषध घेतले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीची परिस्थिती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

मुलीवर उपचार चालू असताना तेथील डॉक्टरांनी मुलगी साडेचार महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. त्याचवेळी फिर्यादी यांच्या लक्षात आले की, ऑक्टोंबर 2018 मध्ये आपल्या मुलीला लग्नाची मागणी घालण्यासाठी काही व्यक्तींनी प्रवीण पोपट खरात याचे स्थळ सुचविले होते. त्यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने नकार कळविला होता. परंतु त्यानंतर मुलगी कॉलेजला जात येत असताना प्रवीण खरात हा तेथे जावून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. याबाबत फिर्यादी यांनी असा प्रकार न करणेबाबत त्याला सक्त ताकीत दिली होती. त्यावरून फिर्यादी यांची खात्री झाली की मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील तिला लग्नाचे अमिष दाखवून प्रवीण खरात याने तिला जुलै 2018 पासून वेळोवेळी भेटून तिला कोठेतरी नेवून तिच्यावर अत्याचार करून तिला गरोदर केले.

याबाबत फिर्याद पुणे येथील स्थानिक पोलिसांकडे दिली होती. सदरची फिर्याद सुपा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार भादंवि कलम 376 तसेच पोक्सो कायदा कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पीडिता ही सुमारे दोन महिने बेशुध्द अवस्थेत होती. पीडिता ही शुध्दीवर आल्यानंतर तिने 4 मार्च, 2019 रोजी जबाब दिला की, सुमारे एक वर्षापूर्वी माझी व प्रवीणची लग्नात ओळख झाली होती. त्याच्यानंतर सन 2018 मध्ये त्याने त्याचे वडील व काका यांना घरी पाठवून लग्नाबाबत बोलणी केली. परंतु पीडिताचे वय 18 वर्षे पूर्ण नसल्याने व शिक्षण चालू असल्याने तिच्या वडिलांनी इतक्यात लग्न करण्यास नकार दिला होता.

परंतु प्रवीण हा पीडितेला सतत तिच्या कॉलेजमध्ये जावू लागला तसेच,‘तु जर भेटली नाही तर तुझ्या काकांला व वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून तिला कारमध्ये नेवून पुणे जवळील एका हॉटेलमध्ये घेवून गेला. तेथे रूमवर गेल्यावर तो म्हणाला की, तु मला खुप आवडते, मला तुझेशी लग्न करावयाचे आहे. असे म्हणून जबरदस्तीने अत्याचार केला.प्रवीणचा त्रास नको म्हणून पीडिताही कॉलेजला जाण्याचे टाळु लागली. परंतु काही दिवसांनी तिला पोटाचा त्रास होवू लागल्याने आपण गर्भवती असल्याचा तिला संशय आला म्हणून तिने शेजारच्यांकडून थायमेट आणले.

17 फेब्रुवारी 2019 रोजी घरात कोणी नसताना ते थायमेट पाण्यातघालून स्वतःचा जिव घेण्यासाठी घेतले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी करून न्यायालयामध्ये आरोपी प्रवीण खरात विरूध्द दोषारोपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी प्रवीण पोपट खरात यास न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com