अत्याचार करणार्‍या पित्यास सक्तमजुरी

अत्याचार करणार्‍या पित्यास सक्तमजुरी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

स्वतःच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या बापाला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 60 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. एच. मनाठकर यांनी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, अकोले तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच बापाने अत्याचार केल्याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर घटनेत पीडित मुलगी ही गरोदर राहिली. या गुन्ह्याचा तपास राजूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी, पोलीस उपनिरीक्षक ए. एन. उजागरे यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर खटला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांचेसमोर चालला.

सरकार पक्षाच्यावतीने 17 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र या खटल्यात पीडित मुलगी व तिची आई या दोघींनी आरोपीच्या बाजूने बचावासाठी साक्ष दिली. परंतु पीडित ही आरोपी याच्यापासून गर्भवती असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पीडित मुलीने फिर्याद दिल्यानंतर ती अहमदनगर येथील एका संस्थेत होती. तिने खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता. मात्र जन्मलेल्या बाळाची परिस्थिती नाजूक असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोपीने पीडितेवर अत्याचार केलेला आहे अशी फिर्याद पीडिताने दिल्यामुळे बाळाचे पालकत्व सिद्ध होण्यासाठी तत्कालीन तपासी अधिकारी सपोनि कादरी यांनी बाळाचे हाडाचे काही भाग डी.एन.ए. साठी राखून ठेवावे, याबाबत जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना पत्र दिले होते. त्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी यांनी बाळाचे हाडे राखून ठेवले. पीडिता व आरोपी यांचे रक्ताचे नमुने डी.एन.ए साठी राखून ठेवण्यात आले. आरोपी, पीडिता, तसेच बाळाच्या हाडांचे नमुने नाशिक येथील रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल पॉझीटीव्ह आला.

सरकारपक्षाच्यावतीने सदर खटल्यात तीन वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष घेण्यात आली. ती महत्त्वपूर्ण ठरली. साक्षीदारांच्या साक्षी तसेच उच्च न्यायालयातील वेगवेगळ्या निकालांचा आधार घेऊन सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी केलेला प्रबळ युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. एच. मनाठकर यांनी आरोपीस भारतीय दंड संहिता 376(2) (एफ) नुसार 10 वर्षे कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे कारावास, तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 4 खाली 10 वर्षे कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे कारावास, तसेच कलम 5 (एन) सह. कलम 6 नुसार 10 वर्षे कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैद, कलम 5 (1) (2), सह कलम 6 नुसार 10 वर्षे, कारावास व 15 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैद, वरील सर्व शिक्षा आरोपीने एकत्रित भोगावयाच्या आहेत.

आरोपीस एकूण झालेल्या दंडाच्या 60 हजार रुपये रकमेतून 40 हजार रुपये पीडित हिस देण्याचा तर 20 हजार रुपये सरकार जमा करण्याचा आदेश दिला आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी पाहिले तर पैरवी अधिकारी महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, सारिका डोंगरे यांनी तर त्यांना सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण डावरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत तोर्वेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली दवंगे यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com