फरार आरोपीला मदत करणारास 3 वर्षांची सक्तमजुरी

जिल्हा न्यायालयाचा निकाल
फरार आरोपीला मदत करणारास 3 वर्षांची सक्तमजुरी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला मदत केल्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी दिली आहे.

खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला आश्रय देऊन पुरावा नष्ट करणार्‍या बाबासाहेब भाऊ मराठे (36, रा. मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड) याला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार दंड अशी शिक्षा ठोठावली.

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल ढगे यांनी काम पाहिले. मच्छिंद्र महादेव अकोलकर हा 7 एप्रिल 2016 रोजी त्याच्या पत्नीला मढी, मायंबा येथे देवदर्शनासाठी जायचे आहे, असे सांगून कारने घेऊन गेला होता.

करंजी ते पाथर्डी जाणार्‍या रस्त्यावर मच्छिंद्र अकोलकर याने त्याची पत्नी अश्विनी हिच्यावर चाकूने वार करून ठार मारले होते. बाबासाहेब मराठे याने खून करण्यासाठी मदत केली होती. तसेच, मयत महिलेचा मृतदेह जातेगाव घाटात नेऊन पेट्रोल टाकून पेटवून देण्यास मदत केली. आरोपी बाबासाहेब मराठे याने मच्छिंद्र अकोलकर याला गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यास मदत केली होती.त्यानंतर आरोपीने स्वतः पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची फिर्याद दिली होती.

त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे यांनी घटनेचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्यावतीने एकूण चौदा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पेट्रोल पंपावरील व टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमधून ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला.

या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने सुरुवातीस अ‍ॅड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. त्यानंतर अ‍ॅड. अनिल ढगे यांनी युक्तीवाद पूर्ण केला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी यांनी सहकार्य केले. पाथर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com