गर्भपाताच्या गोळ्या जप्त प्रकरणी सखोल तपास करणार- एसपी पाटील

गर्भपाताच्या गोळ्या जप्त प्रकरणी सखोल तपास करणार- एसपी पाटील
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी येथे औषध प्रशासन व पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेल्या गर्भपाताच्या गोळ्या कुठे वापरण्यात येणार होत्या, संदर्भात सखोल तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संबंधितांना दिल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

5 मे रोजी एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी टाकलेल्या छाप्यात गर्भपातासाठी दिल्या जाणार्‍या गोळ्यांची पाकिटे जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी सावेडी येथील श्रीराम एजन्सीचे मालक नितीन बोठे, याच्यासह हरियाणा येथील औषध निर्मिती कंपनी आयव्हीए हेल्थकेअरच्या सर्व संचालकांविरोधात औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्वर दरंदले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. यासंदर्भात औषध प्रशासनाकडून सादर करण्यात आलेले अहवाल व इतर कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, या संदर्भात पोलीस अधीक्षक पाटील यांना विचारले असता, सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर असून याची सर्व बाजूने चौकशी व तपास केला जाईल, आरोपींच्या बाबतही लवकरच कारवाई केली जाईल, तसेच या गोळ्यांचा वापर कुठे केला जाणार होता, याचाही शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

बोठेच्या घराला कुलूप

गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीराम एजन्सीचा मालक नितीन बोठे पसार झाला आहे. एमआयडीसी पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी त्याच्या टीव्ही सेंटर येथील घरी भेट दिली असता घराला कुलूप असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी दिली.

Related Stories

No stories found.