कोतकरांनी ऐनवेळी पक्ष बदलला

प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे अ‍ॅड. आगरकर यांची तक्रार
कोतकरांनी ऐनवेळी पक्ष बदलला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ऐनवेळी पक्ष बदलून सभापती झालेले मनोज कोतकर यांनी ते कोणत्या पक्षात आहेत हे जाहीर करावे, अन्यथा पक्षविरोधी कारवाईसाठी सामोरे जावे,

असे स्पष्ट मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनाही निवेदन दिले आहे.

शिवसेनेला महापालिकेत सत्तेपासून दूर ठेवणे, ही तत्कालिन पस्थितीत काहींची गरज होती. त्यातून महापालिकेतील सत्ताधारी आघाडी जन्माला आली. शिवाय राज्यात त्यावेळी भाजपची सत्ता होती. या सत्तेच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी निधी मिळेल, म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यावेळी नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी देखील दिला. मात्र, सत्तेसाठी एकत्र येणे याचा अर्थ भाजपने स्वतःची फरफट करून घ्यावी असा नाही. स्थायी समिती सभापती निवडणूक पक्षासाठी महत्त्वाची असली तरी पक्षाची प्रतिमा पणाला लावण्याएवढी निश्चितच मोठी नाही. सत्तेपेक्षा प्रतिमा जपण्यास भाजपने नेहमीच प्राधान्य दिले आहे.

या निवडणुकीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांची तोंडे बंद करावे लागतील. त्यामुळे कोतकर यांनी वेळीच वस्तुस्थिती समोर मांडून स्वतः वरील कारवाई टाळावी. त्यांना महाविकास आघाडीशी सोयरीक करायची असेल तर खुशाल करावी. मात्र, पक्षाने त्यांच्यावर पक्षशिस्त भंग व पक्षांतर यावरून कारवाई सुरू करावी, अशी मागणी अ‍ॅड. आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com