अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह आढळला

संशयावरून पिता ताब्यात
अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह आढळला

उंबरे |वार्ताहर| Umabre

राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथून शुक्रवारी (दि. 12) रात्रीपासून रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या ऊस तोडणी मजुराच्या साडेचार वर्षाच्या मुलीचा मृतदेह काल

सोमवारी (दि.15) सकाळी नऊ वाजता ऊस तोडणी मजुरांच्या राहुट्यांपासून एक हजार फूट अंतरावरील विहिरीत आढळला. त्यामुळे ब्राम्हणी परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीचा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

दरम्यान, घटनेच्या रात्री दारूड्या नवर्‍याने दारूच्या नशेत मुलीला बाहेर घेऊन गेल्याचे मुलीच्या आईने सांगितले. त्यामुळे मुलीच्या खुनाच्या संशयावरून जन्मदात्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

उत्तरीय तपासणी मृतदेह पाठविण्यात आला आहे. अहवालानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी दिली.

शरद गजानन मोरे (वय 35, रा. लोहगाव, ता. नेवासा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी असलेल्या जन्मदात्याचे नाव आहे. दीपाली शरद मोरे (वय-साडेचार वर्ष) असे त्या दुर्दैवी मृत मुलीचे नाव आहे. मोरे याला दारूचे व्यसन आहे.

शुक्रवारी (दि. 12) रात्री त्याचे दारूच्या नशेत बायकोबरोबर कडाक्याचे भांडण झाले. दारूच्या नशेतच रात्री साडेदहा वाजता मुलीला घेऊन तो बाहेर गेला. रात्री अकरा वाजता परत आला. बायकोने मुलीची विचारणा केल्यावर त्याने शोधाशोध करण्याचा बनाव केला. शनिवारी (दि. 13) रात्री राहुरी पोलीस ठाण्यात मोरे याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोंदविला. तेव्हापासून पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी फौजफाट्यासह शोधमोहीम राबविली. यावेळी पोलिसांनी श्वानपथकाचाही वापर केला.

रविवारी (दि.14) पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक गणेश शेळके यांच्यासह आठ पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रक पथकाचे 20 पोलीस कर्मचारी, श्वानपथक यांनी दिवसभर बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा शोध घेतला. मात्र, त्यांना ती आढळून आली नाही.

दरम्यान, काल सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अनिल तांबे त्यांच्या विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत लहान मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांनी तत्काळ या घटनेची खबर राहुरी पोलीस ठाण्यात दिली. खबर मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

चिमुकलीचा खून करून मृतदेह विहिरीत टाकला असल्याचा संशय असून तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली.

वांबोरी येथील प्रसाद शुगर अ‍ॅण्ड अलाईड अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स लि. या साखर कारखान्यासाठी शेतकर्‍यांचा ऊस तोडणीकरीता आलेल्या ऊस तोडणी मजुरांचा ब्राह्मणी येथे अड्डा आहे. तेथून शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्री राहत्या कोपीतून साडेचार वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. मुलीच्या कुटुंबाने शनिवारी दिवसभर शोध घेऊन मुलगी सापडली नाही.

त्यामुळे त्यांनी शनिवारी रात्री राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. शरद गजानन मोरे (वय 35, रा. लोहगाव, ता. नेवासा) याच्या फिर्यादीवरून, अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, आता चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने खुनाला वाचा फुटली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com