नेवासा तालुक्यात ‘आप’ आगामी निवडणुका लढविणार

माजी शहराध्यक्षांसह भाजपचे अनेक कार्यकर्ते ‘आप’मध्ये
नेवासा तालुक्यात ‘आप’ आगामी निवडणुका लढविणार

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

लोकशाही मार्गाने व्यवस्थेत घुसून तिला लोकाभिमुख बनविण्याची आम आदमी पार्टीची कार्यपद्धती असल्याने नेवासा तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नेवासा नगरपंचायतीच्या सर्व जागा स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा आम आदमी पक्षाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड आणि नगर उत्तर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी केली.

आम आदमी पार्टीची नेवासा तालुका कार्यकारीणी जाहीर करण्याबरोबरच आगामी राजकीय वाटचाल विषद करण्यासाठी नेवासा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत स्पष्ट केले. किरण उपकारे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, प्रवक्ते प्रविण जमधडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी नेवासा भाजपचे माजी शहराध्यक्ष संदीप आलवणे तसेच कचरु सानप, विठ्ठल आखाडे, जबाजी पांढरे, दत्तात्रय नांगरे, पिंटू वायभासे, माधव दगडे, विजय लोंढे, संतोष कापसे, चैतन्य साळवे, राजेंद्र साळवे, आदींनी ‘आप’ मध्ये प्रवेश केला.

यावेळी नगर उत्तर जिल्हाध्यक्ष डुंगरवाल यांनी आम आदमी पार्टीच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी राजू आघाव, उपाध्यक्षपदी भाऊसाहेब बेल्हेकर, अण्णासाहेब लोंढे, देवराम सरोदे, सचिवपदी प्रवीण तिरोडकर, खजिनदारपदी गुलाब पठाण तर नेवासा शहराध्यक्षपदी संदीप आलवणे, निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी सादिक शालेदार यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

प्रामाणिक व लोकाभिमुख राजकीय कार्यप्रणालीमुळे जनसामान्यांचा आम आदमी पार्टी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच्या नेतृत्वावर विश्वास बसला असून नगर जिल्ह्यातून पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा डुंगरवाल यांनी यावेळी केला. सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास अग्रक्रम देण्याबरोबरच तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नेवासा नगरपंचायत निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बापूसाहेब अढागळे, युसूफ शेख, सचिन घोरपडे, भाऊराव मोकाटे, मधुकर पावसे, अनिल तांदळे, डॅनियल जावळे, प्रदीप भालेराव, नितीन गायके, संभाजी गाडे आदी उपस्थित होते. बाळासाहेब साळवे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.