करोनात मृत्यू झाल्याचे भासवून मुलीचा खून केल्याची तक्रार

आपचा आरोप : उपअधीक्षक मुंडे यांच्याकडून चौकशी सुरू
करोनात मृत्यू झाल्याचे भासवून मुलीचा खून केल्याची तक्रार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील तिसगाव येथील एका व्यावसायिकाने स्वतःच्या मुलीचा खून करून तिला करोना झाला होता. त्यात तिचा मृत्यू झाल्याचे भासवून तिच्या मृतदेहाची शेजारच्या गावातील शेतामध्ये विल्हेवाट लावली. संबंधित व्यावसायिकाला आरोग्य विभागातील एका अधिकार्‍याने मदत केल्याची चर्चा आहे. याबाबत खुनाचा प्रकार दडपण्यासाठी पैसे उकळणार्‍यांनी एका वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या नावाचा वापर केल्याचा आरोप करून या खून प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी केली आहे.

शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी याबाबत चौकशी सुरू केली. असून संबधीतांना बुधवार (दि.13) पाथर्डी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविले असल्याचे समजते. तिसगाव येथील एका व्यावसायिकाने त्याची 17 वर्षाची मुलीच्या वर्तणुकीवर संशय घेवुन नातेवाईकांच्या मदतीने राहत्या घरातच हत्या करून तिच्या मृतदेहाची दुसर्‍या गावाच्या हद्दीतील शेतामध्ये रात्रीच विल्हेवाट लावली. सकाळी गावात येऊन आमच्या मुलीला करोना (कोविड) झाला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे शासनानेच अंत्यसंस्कार केल्याचे लोकांना भासविले. या कामी त्या व्यवसायिकाला आरोग्य विभागातील एका अधिकार्‍याने मदत केली. याची माहिती काही पोलिसांना समजताच त्यांनी सदर व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळले.

याबाबत पोलिस निरीक्षक व पोलीस स्टेशनला माहीती न देता फक्त संबंधीताकडून वारंवार पैसे घेऊन हा खून दडपला.पैसे उकळण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नावाचा वापर केल्याचे समजते. शासन बेटी बचाव बेटी पढाव सारख्या योजनांवर कोट्यावधी रुपये खर्च करत असतानाच शासनाचे अधिकारी कर्मचारी व अधिकारी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून हत्या, खून करणार्‍यांना मदत करून संरक्षण करत असतील तर अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास करून दोषी व्यक्तीवर कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करावा.

पोलिसांच्या कामकाजाची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने बुधवार (दि. 13) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी मुंडे यांच्या शेवगाव येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे गृहमंत्री, वरीष्ठ पोलिस अधिकारी यांना दिल्या आहेत. याबाबत अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पोलिस अधिकार्‍यांना या प्रकराबाबत काही माहीती दिल्याचे समजते.उपविभागीय पोलिस अधिकारी मुंडे यांनी तिसगाव येथे जाऊन सोमवारी चौकशी केली. मात्र, संबधीत कुटुंब भेटले नाही. त्यांना बुधवारी पाथर्डी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविले आहे.

Related Stories

No stories found.