
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचे शिक्के व लेटर पॅड, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, मनपाच्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्या शिक्क्यांचा परस्पर वापर करणार्या गुलमोहर रस्त्यावरील एका आधारकार्ड दुरूस्ती केंद्रावर कारवाई करण्यात आली. तोफखाना पोलिसांनी सोमवारी छापा टाकून तेथील साहित्य ताब्यात घेतले.
याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हारूण हबीब शेख (वय 31 रा. वरवंडी, ता. राहुरी) व दादा गोवर्धन काळे (वय 35 रा. निंबोडी, ता. नगर) अशी त्यांची नावे आहेत. सावेडीतील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कार्यालयाजवळीत एका गाळ्यामध्ये सक्सेस मल्टीसर्व्हिस आधार कार्ड दुरूस्तीचे केंद्र आहे. या ठिकाणी बनावट कागदपत्र तयार केले जात आहेत, अशी माहिती खबर्याकडून तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. त्यांनी पथकासह सोमवारी दुपारी आधार दुरूस्ती केंद्रावर छापा टाकला.
पंचासमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये या केंद्रात आ. तनपुरे, आ. जगताप, महानगरपालिका शाळेच्या (क्रमांक 23) मुख्याध्यापिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक या नावाचे चार शिक्के आढळून आले. या केंद्रातील हारूण शेख, दादा काळे आणि वीरकर ही महिला असे तिघे कार्यरत होते. नागरिकांना आधार दुरूस्तीसाठी शासकीय पुरावा नसल्यास आमदारांच्या शिक्क्यांचा वापर करून रहिवाशी दाखला देणे, वयाच्या दाखल्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रूग्णालय यांच्या शिक्क्याचा वापर केला जात होता.
या केंद्रातील सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केले आहेत. निरीक्षक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जे. सी. मुजावर, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुरज वाबळे, कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.