
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील एका तरुणाचा घराच्या छतावरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली आहे. योगेश संजय रहाणे (वय-25) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मधुकर परभत रहाणे यांनी शिर्डी पोलिसांत दिलेली माहिती अशी, पुतण्या योगेश संजय रहाणे हा सोमवारी सकाळी त्याचे कारमध्ये कोकणगाव येथे निझर्णेश्वरला त्याची आई जिजाबाई संजय रहाणे हीचेसोबत गेलेला होता. रात्री 8 ते साडेआठ वाजेच्या सुमारास ते दोघेही पुन्हा घरी आले. योगेश याने घरी आल्यानंतर गायीचे दूध काढले, त्यानंतर तो आईला सांगून सरकीचे पोते आणण्यासाठी गावात गेला होता व रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तो घरी आला. तो रात्री झोपण्यासाठी माझे चुलते भानुदास गोविंद रहाणे यांच्या घरी जात असतो.
तेथे कधी घरात किंवा त्यांचे घराच्या गच्चीवर नेहमी झोपत असतो. तो झोपण्यासाठी गेला तेव्हा त्यास घरी आलेला पाहिले होते. पहाटे 4 वाजेच्या सुमारास माझे चुलते भानुदास गोविंद रहाणे हे झोपेतून उठले व घराबाहेर आले तेव्हा त्यांना योगेश हा घराच्या ओट्यावर पडलेला दिसला. म्हणून त्यांनी मला उठवले व त्यानंतर मी इतरांना उठवले व योगेश यास आम्ही पाहीले तेव्हा त्याचे नाका-तोंडातून रक्त आलेले होते, तसेच पायाला जखम झालेली होती व त्याचे डोक्याला रक्त लागलेले दिसत होते.
आम्ही त्याचे खिशे तपासून पाहिले, त्याच्या खिशात मोबाईल नव्हता फक्त गाडीची चावी होती. त्याचे मोबाईलवर फोन करून मोबाईल शोधला असता तो आम्हाला घराच्या गच्चीवर मिळाला आहे. झोपण्यासाठी तो माझे चुलते भानुदास गोविंद रहाणे यांचे घराचे गच्चीवर गेला असताना गच्चीवरून खाली पडून मयत झाला असावा असा अंदाज आहे. याबाबत शिर्डी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद कऱण्यात आली आहे अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत.