पेट्रोल पंपावर मोटारसायकल पेटल्याची व्हायरल व्हिडीओ क्लिप बनली डोकेदुखी...
सार्वमत

पेट्रोल पंपावर मोटारसायकल पेटल्याची व्हायरल व्हिडीओ क्लिप बनली डोकेदुखी...

आज सकाळ पासून व्हॅटसप, फेसबुक या सोशल माध्यमांवर पेट्रोल भरत असतांना मोटारसायकल पेटल्याची व्हिडीओ फिरत आहे

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकत असतांना अचानक आग लागून पेट्रोल डिलिव्हरी पाईप व मोटारसायकलने पेट घेतल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही क्लिप संबंधितांना डोके दुखीची ठरली आहे.

आज सकाळ पासून व्हॅटसप, फेसबुक या सोशल माध्यमांवर पेट्रोल भरत असतांना मोटारसायकल पेटल्याची व्हिडीओ फिरत आहे. यात 24 जुलै 2020 रोजी सकाळी 9:36 वाजता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असतांना पेट्रोल डिलिव्हरी पाईप व मोटारसायकलने अचानक पेट घेतल्याचे दिसत आहे. आग लागताच डिलिव्हरी बॉयने हातातील पेट्रोल डिलिव्हरी पाईप तर मोटारसायकलवर बसलेल्या तरुणाने मागे बसलेल्या आजोबासह गाडी सोडून दिली व आजोबाला घेऊन पळ काढल्याचे चित्र दिसत आहे. त्याच बरोबर पंपावरील दुसऱ्या कर्मचाऱ्याने पंपावरील आग प्रतींबधक उपकरण फोडून आगीवर फवारा मारून आग विझली असे ही दिसत आहे.

मात्र हा व्हिडीओ खातर जमा न करता कुकाणा येथील नामांकित नेत्याच्या नावासह ही घटना त्यांच्या पंपावर घडले अशी माहिती शेअर केल्याने त्यांना तालुकाभरातून पत्रकार, टीव्ही चॅनेल व हितचिंतकांचे यांचे फोन सुरू झाले. प्रत्येकाच्या फोनला उत्तर देता देता त्यांची डोकेदुखी वाढली. असे काही घडलेच नाही याची माहिती मिळाल्यावर मात्र सर्वांना दिलासा मिळाला.

कुकाणा येथे ही घटना घडली नाही तर मग कुठे घडली आणि या व्हिडीओचा पेट्रोल पंपावरील सिसिटिव्ही फुटेज आले कोठून हा प्रश्न मात्र अद्याप ही अनुत्तरित आहे.

Deshdoot
www.deshdoot.com