राहाता येथील लाँड्री चालक आणि कावळ्याची अनोखी मैत्री

लॉकडाऊनमध्येही जपले ॠणानुबंध!
राहाता येथील लाँड्री चालक आणि कावळ्याची अनोखी मैत्री

राहाता (प्रतिनिधी) /rahata - शहरातील एका लॉन्ड्री चालकाची कावळ्याशी अनोखी मैत्री जडली आहे. एक कावळा दररोज लॉन्ड्री चालक संजय रंधे यांच्या भेटीला येतो काव, काव करून त्यास बोलावतो आणि त्याने दिलेले पाणी आणि पापडीवर यथेच्छ ताव मारतो. त्यानंतर काही वेळ थांबून पुन्हा मार्गक्रमण करतो. गेल्या अडीच वर्षापासून यात बदल झालेला नाही. लॉकडाऊनच्या काळात दुकान बंद असताना देखील रंधे यांनी हे ॠणानुबंध तसेच जपले आहेत.

कावळ्याचा काळा रंग आणि कर्कश असा काव काव आवाज... त्यामुळे बहुतांशी जणांचा कावळा हा नावडता पक्षी! दशक्रियाविधीच्या वेळी पिंडीला कावळा शिवावा यासाठी त्याला विनवणी करतात. मात्र राहाता शहरातील संजय रंधे या लाँड्री चालकाने एका कावळ्याला चक्क मित्रासारखा जीव लावला आहे. हा कावळा दररोज दुकानासमोर येतो, काव काव करून रंधे यांना आवाज देतो.आवाज ऐकताच संजय रंधे हे हातातील काम सोडून आपल्या या मित्राला खाण्यासाठी पापडी आणि पिण्यासाठी पाणी देतात. मागील अडीच वर्षांपासून हा दिनक्रम असाच सुरू आहे. त्यामुळे लाँड्री चालकाची आणि या कावळ्याची अगदी घट्ट मैत्री झाली आहे.

सुरूवातीला हा कावळा अन्वर तांबोळी यांच्या हॉटेलबाहेर येऊन थांबायचा. अन्वर त्याला पाणी आणि हॉटेलमध्ये बनवलेले जेवण खावू घालायचा. त्यानंतर कावळ्याने रंधे यांच्या दुकानासमोर हजेरी लावण्यास सुरूवात केली. दोन वर्षापासून कावळ्याला खाऊ घालणे हा त्यांचा आता नित्यक्रम बनला आहे.

वर्दळीचे ठिकाण असूनही हा कावळा न चुकता दररोज आपल्या मित्राला भेटायला येतो. करोना संकट काळात लॉकडाऊन झाले असताना रंधे यांचे दुकानही बंद होते मात्र तरीही आपला मित्र उपाशी राहू नये यासाठी हा लाँड्री चालक दररोज दुकानासमोर बसून या कावळ्याची वाट बघत असत. तो येताच त्याला पाणी आणि पापडी द्यायचा. गेल्या अडीच वर्षांपासून आजही हा नित्यक्रम असाच सुरू असून संजय रंधे आणि या कावळ्याची अनोखी मैत्री परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com