तळेगाव दिघे | वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील वडगावपान फाट्यावर अचानक आग लागून लॅपटॉपसह दोन कोटी रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य घेवून जाणारा मालट्रक पेटला.

लागलेल्या आगीत लॅपटॉपसह इलेक्ट्रिक साहित्य आगीत जळाल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक बंबच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. सोमवारी ( दि. २९ ) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पुणे येथून लॅपटॉपसह दोन कोटी रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य मालट्रकमध्ये ( क्र.आरजे १४ जीजे ३९७१) घेवून चालक विजय नारायण डुबे (मध्यप्रदेश) हा संगमनेर मार्गे गुडगाव (हरियाणा) येथे चालला होता.

सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सदर मालट्रक वडगावपान फाटा येथे थांबवून चालक विजय नारायण डुबे हा चहा घेण्यासाठी थांबला असता मालट्रकला आग लागल्याचा प्रकार लक्षात आला. वडगावपान फाटा परिसरात लोकवस्ती असल्याने युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात यांनी चालकास मालट्रक सुरक्षितस्थळी दूर घेण्यास सांगितले व मदतकार्य केले.

त्यानंतर अग्निशामक बंबच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत लॅपटॉप व इलेक्ट्रिक साहित्यासह लाखो रुपयांचे साहित्य आगीत जळाले. नक्की किती रकमेचे नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही.

इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होवून मालट्रकला आग लागली असावी, असा अंदाज आहे. मालट्रक पेटल्याने लागलेल्या आगीत लॅपटॉपसह इलेक्ट्रिक साहित्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले.