पारंपरिक बियांचा वापर करून साकारली विठुरायाची प्रतिकृती

पारंपरिक बियांचा वापर करून साकारली विठुरायाची प्रतिकृती

अकोले (प्रतिनिधी) - तालुक्यातील देवगाव येथील बीज माता सौ. ममताबाई भांगरे व देवराम भांगरे या दाम्पत्याने व त्यांच्या मुलांनी पारंपारिक बियाण्यांचा वापर करून आपल्या अंगणातच आषाढी एकादशी निमित्ताने विठुरायाची प्रतिकृती साकारली आहे. ‘याची देही याची डोळा’ याप्रमाणे साकारलेल्या विठूरायांच्या प्रतिकृतीच्या दर्शनासाठी पंढरपूर ऐवजी देवगाव येथे परिसरातील आदिवासी गावातील भाविक दर्शनासाठी येत आहेत.

आषाढी एकादशी म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रात पांडुरंगाचा उत्सव उभा राहतो. या उत्सवात वारकरी टाळ, मृदंग, पखवाद या पारंपरिक वाद्यांच्या साह्याने अवघा आसमंत गर्जून सोडतात. विठुरायाच्या दर्शनासाठी खेड्यापाड्यांतून भाविक यानिमित्त पंढरपुरात जमा होत असतात. परंतु काही भाविक असे आहेत की ज्यांना आपल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. प्रपंचाची जबाबदारी त्यांना तीथपर्यंत पोहोचू देत नाही. परंतु पांडुरंगाचे भक्त याही परिस्थितीत आपल्या विठुरायाचे दर्शन घ्यायला कुठेही कमी पडत नाहीत. याचे उदाहरण म्हणजे जगभर बीज माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममताबाई भांगरे यांनी आपल्या घराच्या अंगणात विठुरायांची प्रतिकृती साकारली आहे.

या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या आदिवासी गावातील पाड्यातील महिला आबालवृद्ध मोठ्या संख्येने दर्शन घ्यायला येत आहेत. अतिशय सुंदर कल्पकतेने वेगवेगळ्या आकारातील, रंगातील बियाणे वापरून ही प्रतिकृती त्यांनी साकारली आहे. जमिनीवर सडा टाकत व अंगण स्वच्छ करत आपल्या लाडक्या विठुरायाला बियाण्यांच्या रूपात मांडताना त्यांनी अत्यंत कल्पकता आणि बियाण्यांची रंग संगती यामध्ये वापरली आहे. म्हणतात ना देव आपल्या कामात असतो कर्मात असतो तेच या दाम्पत्याने दाखवून दिले आहे. साक्षात विठुराया देवगावातील त्यांच्या झोपडीमध्ये विसावला आहे असाच भास याठिकाणी होत आहे. असंख्य भाविक विठुरायाला वेगवेगळ्या रूपात बघत असतात. या दाम्पत्याने मात्र विठुरायाला पारंपारिक बियाणे, निसर्गातील पानाफुलात बघितले आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com