श्रीरामपुरात लॉकडाऊनचा नवा प्रकार ; ‘समोरून बंद मागून चालू’

श्रीरामपुरात लॉकडाऊनचा नवा प्रकार ; ‘समोरून बंद मागून चालू’

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - राज्यामध्ये करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने पंधरा दिवसाचा कडक लॉकडाऊन, संचारबंदी व जमावबंदी जाहीर केली. मात्र या उपाययोजनांचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्याने असा लॉकडाऊन वर्षभर ठेवला तरी कोरोना कमी होणार नाही, असे चित्र श्रीरामपूर शहरात दिसत आहे.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू आहेत. भाजीपाला, फ्रुटची दुकाने चालू आहेत. गाड्या रस्त्यावर धावत आहेत. रिकामटेकडे लोक रोडवर गर्दी करत आहेत. काही दुकानदार समोरचे शटर बंद ठेवून मागच्या दाराने दुकानदारी करत आहेत. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वकाही केले जात असताना छुप्या मार्गाने गर्दी होत आहे. त्यामुळे असा लॉकडाऊन काही उपयोगाचा नाही. मागील वर्षाप्रमाणे अत्यंत कडक असा लॉकडाऊन होणे गरजेचे आहे. रस्ते बंद करणे आवश्यक आहे. तरच करोनावर नियंत्रण मिळवता येईल. अन्यथा येत्या पंधरा दिवसात गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.

लॉकडाऊनमुळे काही दुकाने बंद आहेत. मात्र इतर दुकाने ग्राहक आणि व्यापारी यांच्या परस्पर संबंध आणि संमतीने सुरू आहेत. समोरून शटर डाऊन दिसत असले तरी मागच्या दाराने आतमध्ये सर्व काउंटर चालू आहेत. हॉटेलमधून फक्त पार्सल सुविधा देण्याचे आदेश असले तरी आतमध्ये टेबल वर बसून सर्व सुरू आहे. विनाकारण गाड्या इकडून तिकडे फिरत आहेत. पोलीस मात्र फारशी दखल घेताना दिसत नाही. भाजीपाला विक्रेते गल्लोगल्ली आपल्या गाड्या, हातगाड्या, सायकली घेऊन फिरत आहेत. लोक गर्दी करीत आहेत त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवणार? मागील वर्षी ज्या प्रमाणे शहरात ठिकठिकाणी रस्ते बंद करण्यात आले होते तसेच ते पुन्हा करण्याची गरज आहे.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण धडपड करीत असताना गर्दी कमी करणे अपेक्षित असल्याने केलेल्या उपाययोजना फोल ठरल्या आहेत. पोलीस लोकांना वेठीस धरून पावत्या फाडण्यात मग्न आहेत. सक्तीने रस्त्यावर गाड्या बंद केले पाहिजे. पेट्रोल पंप बंद केले पाहिजे. अशा तीव्र प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com