मृद व जलसंधारण विभागाची नगर जिल्ह्यात दोन नवीन उपविभागीय कार्यालय सुरु होणार

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची माहिती
मृद व जलसंधारण विभागाची नगर जिल्ह्यात दोन नवीन उपविभागीय कार्यालय सुरु होणार

नेवासा । तालुका प्रतिनिधी

मृद व जलसंधारण विभागाची नवीन कार्यालये सुरु होणार आहेत. यामध्ये ५ जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये आणि १८ नवीन उपविभागीय कार्यालये सुरु होणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली राज्यस्तर यंत्रणेकडे एकूण २६ जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये तसेच १२७ उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत तर जिल्हा परिषद यंत्रणेकडे एकूण ३१ जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये तसेच १६८ उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत.

विभागाच्या राज्यस्तर यंत्रणेकडील कामकाजाची व्यापकता व यंत्रणेवरील कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने राज्यस्तर यंत्रणेकडील जिल्हा कार्यालये आणि उपविभागीय कार्यालये यांची संख्या काही प्रमाणात वाढ केल्यास राज्यस्तर यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणा यांचा समतोल साधला जाऊन मनुष्यबळाचा योग्य वापर होण्यास मदत होणार आहे. राज्यस्तर यंत्रणेमध्ये रायगड, नंदुरबार, परभणी, हिंगोली, भंडारा अशी पाच नवीन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

जिल्हा जलसंधारण अधिकारी, ठाणे अंतर्गत ठाणे, पालघर व रायगड या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र होते. म्हणून रायगड येथे नवीन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय निर्माण केले असून या कार्यालयाचे मुख्यालय अलिबाग येथे राहील. राज्यस्तर यंत्रणेतील जिल्हा जलसंधारण अधिकारी, धुळे या कार्यालयाचे विभाजन करण्यात येऊन नंदुरबार येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहे. राज्यस्तर यंत्रणेतील जिल्हा जलसंधारण अधिकारी, जालना या कार्यालयाचे विभाजन करण्यात येऊन परभणी येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहे. राज्यस्तर यंत्रणेतील जिल्हा जलसंधारण अधिकारी, नांदेड या कार्यालयाचे विभाजन करण्यात येऊन हिंगोली येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहे.

राज्यस्तर यंत्रणेतील जिल्हा जलसंधारण अधिकारी, गोंदिया या कार्यालयाचे विभाजन करण्यात येऊन भंडारा येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय नव्याने स्थापन करण्यात येणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील उपविभागीय कार्यालयांच्या संख्येमध्येही बदल करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात धारणी येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. तर बुलढाणा येथे नवीन उपविभागीय जलसंधारण कार्यालय असेल. जळगाव जिल्ह्यात चोपडा येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे.

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. तर भंडारा येथे नवीनउपविभागीय जलसंधारण कार्यालय असेल. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. परभणी जिल्ह्यात सेलू आणि पाथरी येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. गडचिरोली जिल्ह्यत वडसा येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे.

नेवासा-कोपरगांव येथे नवीन उपविभागीय कार्यालय

अहमदनगर जिल्ह्यात नेवासा आणि कोपरगांव येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. तर सातारा येथे उपविभागीय जलसंधारण कार्यालय असेल.

रायगड येथे जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय असण्याबरोबरच अलिबाग येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. याशिवाय हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे जिल्हा परिषदेसाठी नवनिर्मित उपविभागीय जलसंधारण कार्यालय असणार आहे. या नवीन रचनेमुळे जलसंधारण विभागाचे कामकाज गतिमान होणार आहे. संबंधित लोकप्रतिनिधींची अनेक वर्षांची मागणी या निमित्ताने पूर्ण होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com