MIDC च्या प्रश्नासंदर्भात श्रीरामपूर येथे लवकरच बैठक

MIDC च्या प्रश्नासंदर्भात श्रीरामपूर येथे लवकरच बैठक

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

एमआयडीसीच्या प्रश्नासंदर्भात श्रीरामपूर येथे लवकरच बैठक आयोजित करून हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले.

श्रीरामपूर, कोपरगाव तसेच राहरी एमआयडीसीच्या प्रश्नासंदर्भात माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची मुंबई येथे शिवनेरी बंगल्यावर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी दिली.

श्रीरामपूर, राहाता आणि कोपरगाव या ठिकाणी एमआयडीसीचे अनेक प्रश्न प्रलंबित असून श्रीरामपूर या ठिकाणी नवीन उद्योग आणण्यासाठी काय प्रयत्न करता येतील या व अशा अनेक प्रश्नासंदर्भात यावेळी श्री. देसाई यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी मंत्रीमहोदयांनी श्रीरामपूरला लवकरच एक बैठक आयोजित करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे शिष्टमंडळास दिले. आश्वासन

जिल्हाप्रमुख खेवरे यांनी श्रीरामपूर, कोपरगाव आणि राहुरी या ठिकाणी नवीन उद्योग आणण्यास जागा तसेच रोजगाराच्या अनेक संधी कशा उपलब्ध करून देता येईल, याची सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली. या सूचनांवर त्यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शहरप्रमुख सचिन बडदे, कोपरगाव तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, कोपरगाव शहरप्रमुख कलविंदर दडीयाल, विशाल झावरे, राधाकिसन बोरकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.