Sai Samadhi Temple
Sai Samadhi Temple|Shirdi Tourism
सार्वमत

साई समाधी मंदिराच्या तळघरात झिरपतेय पाणी

पाझर रोखण्यासाठी संस्थानचे प्रयत्न सुरू

Nilesh Jadhav

शिर्डी | शहर प्रतिनिधी | Shirdi

करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईसमाधी मंदिरातील तळघरात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असून संस्थानच्यावतीने सदरचे पाणी बंद करण्यासाठी केमिकलच्या सहाय्याने तसेच अन्य उपाययोजना सुरू आहे.

एका ठिकाणी पाणी बंद केले तर दुसर्‍या ठिकाणाहून पाणी झिरपायला सुरुवात होत असल्याने सदरचे पाणी कोठून येते याचा अद्यापही शोध लागला नाही मात्र यासाठी संस्थानच्यावतीने शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती साईबाबा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

साई मंदिरालगत असलेल्या तळघरात मागील आठवड्यापासून अचानक पाणी झिरपण्यास सुरुवात झाली असून 24 तासात साधारणपणे 300 लिटरपेक्षा जास्त पाणी पाझरले आहे.

शेकडो वर्षापासून बांधण्यात आलेल्या या श्रीमंत बुट्टी वाड्यातील तळघरात दैनंदिन पूजेच्या समयी वापरण्यात येणार्‍या साईबाबांची मौल्यवान आभूषणे तसेच पूजेच्या वस्तू ठेवण्यात येत असतात. हे तळघर साई समाधीच्या डाव्या बाजूला असून त्यावरूनच भाविकांची दर्शन रांग सुरू असते.

दरम्यान पावसाचे पाणी पाझरत असावे असा प्राथमिक अंदाज संस्थानच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला असला तरीसुद्धा अनेक मोठमोठे पावसाळे झाले त्यावेळी तर चक्क गोदावरी असो वा अन्य नद्यांना न भूतो न भविष्यति असा पूर आला होता. यावेळी पावसाचे पाणी अनेक ठिकाणी शिरले होते. लेंडी नाल्याला देखील पूर आला होता, शहरातील अनेक भागात पाणी साचले त्यावेळी मात्र असा प्रकार कधीच बघायला मिळाला नाही.

मात्र मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे, साई मंदिर बंद आहे, सरासरी प्रमाणे पर्जन्यवृष्टी झाली आहे. असे असताना ही परिस्थिती अचानकपणे कशी उद्भवू शकते असा प्रश्न अनेक साईभक्तांना भेडसावत असून याबाबत शहरातील ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहे. पाण्याचा पाझर थांबवण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रघुनाथ आहेर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी प्रयत्नशील आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com