दाढ खुर्द येथे बिबट्यांचा कळप

महिलेसह शेळ्यांवर केला हल्ला ; शेतकर्‍याचा थेट वनमंत्र्यांना फोन, रात्रीच पिंजरे हजर
दाढ खुर्द येथे बिबट्यांचा कळप

आश्‍वी (वार्ताहर) -

संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील नानाभाऊ वाघमारे यांच्या वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री सहा बिबट्यांनी मिळून बंदीस्त गोठ्यात हल्ला करुन दोन शेळ्या मारल्या

तर आरडाओरडा करणार्‍या महिलेवर ही हल्ला केला. परंतु ही महिला थोडक्यात बचावल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

दाढ खुर्द शिवारात गट नंबर 143 मध्ये नानाभाऊ वाघमारे यांची वस्ती व बंदीस्त जनावरांचा गोठा आहे. शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास वाघमारे वस्तीवर सहा बिबटे शिकारीच्या शोधात दाखल झाले होते. त्यामुळे शेळ्यांनी मोठ्याने ओरडण्यास सुरवात केली. त्यामुळे नेमके काय झाले हे पाहण्यासाठी वाघमारे कुटुंब बाहेर आले असता दोन बिबटे गेट समोर, दोन बिबटे मागील बाजूला तर दोन बिबटे थेट आंब्याच्या झाडाचा आधार घेऊन बंदीस्त गोठ्यात शिरलेले दिसले. यावेळी बिबट्यांनी दोन शेळ्या ठार करत एक शेळी उचलून गोठ्याबाहेर नेली. यावेळी बिबट्यांना हुसकवण्यासाठी वाघमारे कुटुंब सरसावले असता बिबट्याने बबई वाघमारे या महिलेवर हल्ला केला. पण दैव बलवत्तर म्हणून महिलेची पंजा लागल्याने केवळ साडी फाटली. महिला थोडक्यात बचावली. त्यामुळे वाघमारे कुटुंबियात मोठी दहशत निर्माण झाल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

यामुळे नानाभाऊ वाघमारे यांनी स्थानिक नागरिकांसह संगमनेर वनविभागाला माहिती देण्यासाठी फोन केला असता वनविभागाच्या अधिकार्‍यानी फोन उचलला नाही. त्यामुळे वाघमारे यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांना फोन करुन घडलेल्या गंभीर घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभिर्य ओळखत वनमंत्र्यांनी थेट प्रशासकीय यंत्रणा हलवल्याने बिबट्यांना पकडण्यासाठी पिजंर्‍यासह अधिकार्‍यांचा फौज फाटा रात्री 2.30 वाजेच्या सुमारास वाघमारे यांच्या वस्तीवर दाखल झाला. अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

तर घटनेची माहिती मिळताच संजय भांड, राजेंद्र जमधडे, अविनाश जोशी, सतिष जोशी, सुधीर जोरी आदिसह स्थानिक ग्रामस्थ वाघमारे यांच्या वस्तीवर आले होते. यावेळी दहशतीखाली असलेल्या वाघमारे कुटुंबाला ग्रामस्थांनी आधार दिल्याची माहिती वाघमारे यांनी दिली आहे.

दरम्यान सहा बिबट्यांनी मिळून हल्ला केल्याची संगमनेर तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली असून कोणतीही मोठी दुर्दैवी घटना घडण्याआधी कळपात हल्ला करणारे हे सहा बिबटे जेरबंद करावे अशी मागणी दाढ खुर्द ग्रामस्थांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com