संगमनेर । प्रतिनिधी

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला संगमनेर शहर पोलिसांनी शिताफीने पाठलाग करुन पकडले. ही कारवाई आज बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास

नाशिक-पुणे महामार्गावरील गुंजाळवाडीकडे जाणार्या बोगद्याजवळ करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असिफ अन्सार पठाण (वय 31, रा. नाईकवाडपुरा, संगमनेर), तन्वीर कादिर शेख (वय 36, रा. दिल्लीनाका, संगमनेर), भुषण बंडू थोरात (वय 29, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), अमोल जोंधळे (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर), बबलु उर्फ फिटर (रा. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन घेवून दरोडा टाकण्याच्या तयारीत आले होते. नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर ते गुंजाळवाडी बोगद्याजवळ हे सर्व दबा धरुन बसले होते. रस्त्याने येणार्या जाणार्यांना देखील लुटण्याचा या आरोपींचा प्रयत्न होता. माहिती शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. पोलिस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. मात्र पोलिसांनी तिघा जणांना पकडले. तर अमोल जोंधळे व बबलू फिटर हे दोघे पळून गेले. पकडलेल्या आरोपींकडून चार चाकी वाहन, तीन मोबाईल, दरोडा टाकण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.