मित्रानेच केला मित्राचा खून

अकोले तालुक्यातील घटना
मित्रानेच केला मित्राचा खून

अकोले |प्रतिनिधी| Akole

मित्रानेच मित्राला गाडीवर गर्दणीच्या डोंगरावर नेऊन लोखंडी रॅाडने डोक्यात मारून खून केल्याची घटना अकोले शहराजवळ घडली आहे. अशरफ अतिक शेख (17 वर्षे 6 महिने रा.शाहूनगर, अकोले) असे मयत मुलाचे नाव आहे. मारेकरीही अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान वाढदिवशी फोटो काढण्यावरून या दोघांत वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, काल रविवारी अतिक नौशाद दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा अल्पवयीन मुलगा अशरफ अतिक शेख यास रविवार दि 18 जून रोजी दुपारी 12-30 वा दरम्यान फिर्यादीच्या घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळवून नेले. त्यावरून अकोले पोलिसांनी रात्री गु.र.नं.396/2023 भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. यावेळी समजलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रविवारी दुपारी अशरफ अतिक शेख यास एक अल्पवयीन युवक गाडीवर गर्दणीच्या दिशेने घेऊन जात असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार सोमवार दि 19 जून 2023 रोजी सकाळी पोलिसांनी संशयावरून संबंधित युवकास ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांना गर्दणीच्या डोंगरावर नेऊन तिथेच मित्र अशरफ अतिक शेख याचा डोक्यात रॉड मारून खून केला असल्याचे सांगितले. वाढदिवशी फोटो काढण्यावरून या दोघांत शाब्दीक चकमक झाली होती. त्या रागातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.

दरम्यान पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे दुपारीपासूनच तळ ठोकून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. आरोपीने कबुली दिली असली तरी अन्य बाजूनेही तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या मारेकर्‍यास त्वरीत अटक व्हावी व त्याच्यावर कडक शासन व्हावे या मागणीसाठी अकोले पोलिस स्टेशनला मोर्चा नेत अकोले मुस्लिम समाजाने पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन दिले.

रात्री उशीरा मयत युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यावेळी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com