लोणी (वार्ताहर)-

राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील शिवाजी दगडू गुजर यांच्या घरात विजेचे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत

संसारोपयोगी वस्तू व रोख रक्कम असे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले.

शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गुजर कुटुंबीय गाढ झोपेत असताना अचानक घरात आगीचे लोळ आणि धूर झाल्याने ते जागे झाले व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले. मध्यरात्रीची वेळ असल्याने कुणी मदतीला तात्काळ येऊ शकत नव्हते. शक्य तेवढे प्रयत्न करतानाच या कुटुंबाने आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांकडे मदतीचा धावा केला. लोक आले देखील पण आग एवढी मोठी होती की तिच्यावर नियंत्रण मिळवणे अवघड झाले होते. काहींनी विखे कारखान्याच्या अग्निशमन दलास बोलावून घेतले. ते येईपर्यंत गुजर यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, फॅन, कपडे, भांडी, धान्य, किराणा सामान व 50 हजारांची रोकड या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मोलमजुरी करणार्या या कुटुंबाला आगीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तलाठी, ग्रामसेवक व शासकीय यंत्रणेने नुकसानीचा पंचनामा केला असून या कुटुंबाला दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे.