राहुरीच्या पोलिसावर लाच मागणीचा गुन्हा

गुन्ह्यात मदत केल्याने मागितले चार हजार रूपये
राहुरीच्या पोलिसावर लाच मागणीचा गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी)

चार हजार रूपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शाहमद शब्बीर शेख याच्याविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली.

मुलनमाथा (ता. राहुरी) येथील तक्रारदार यांच्याविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात अदलखपात्र गुन्हा दाखल असून सदर अदलखपात्र गुन्ह्यात तक्रारदार यांच्यावर राहुरी तहसील कार्यालय येथे चॉप्टर केस करण्यात आली आहे. सदर चॉप्टर केसमध्ये मदत केल्याच्या मोबदल्यात पोलीस नाईक शाहमद शब्बीर शेख याने तक्रारदार यांचेकडे पाच हजार रूपयांची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदार यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

13 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाने केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान पोलीस नाईक शेख याने तक्रारदार यांच्याकडे पंच साक्षीदार समक्ष तडजोडीअंती चार हजार रूपयांची मागणी केली होती. म्हणून शेख याच्याविरूध्द शुक्रवारी लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार संतोष शिंदे, विजय गंगुल, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हारून शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com