करुणा मुंडेंविरोधात संगमनेरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

नेमकं काय आहे प्रकरण?
करुणा मुंडेंविरोधात संगमनेरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

संगमनेर ( शहर प्रतिनिधी)

माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांच्याविरुद्ध संगमनेर (Sangamner) शहर पोलीस ठाण्यात (Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भारत भोसले यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आपल्यावरील आरोप खोटा असून आपलीच फसवणूक झाली असल्याचे त्यांनी म्हटले होते.

याबाबत त्यांनी मागील महिन्यात शहर पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली होती. मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल केला नव्हता. यानंतर भोसले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे सादर केले. यानंतर काल मुंडे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी काही दिवसापुर्वी करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा तिच्या सोबत ओळख झाली होती. मला करुणा मुंडे यांनी नविन पक्ष काढण्यासाठी व त्यासाठी सोबत राहून काम करण्याची विनंती केली. पक्ष काढण्यासाठी व बांधणीकरीता ४ लाख रुपये मागीतले. आपण मुंडे यांना ४ लाख रुपये रोख स्वरुपात दिले. त्यानंतर पुन्हा ३६ लाख रूपये मागीतले. तेव्हा मी माझ्याकडे असलेले सोने १३.७३० तोळे व व माझा मित्र बालमभाई शेख याचेकडे ११.१२२ तोळे सोने असे एकुण २४ तोळे सोने करुणा मुंडे यांना दिले. त्यावेळी मुंडे यांनी मला पक्षाची नोंदणी झाल्यानंतर पक्षाकडे पैसा जमा झाल्यानंतर पैसे परत करण्याचे आश्वासन दिले.

तसेच त्यानंतर पक्ष बांधणीसाठी एकुण ४० लाख रुपये लागत असल्याने त्यांनी मला वेळोवेळी पैश्याची मागणी केल्याने मी आर. टी.जी.एस व्दारे रोख स्वरुपात व बैंक ट्रान्सफर व्दारे मी तसेच माझा मित्र बालम शेख, भाऊ अमोल भोसले, पत्नी राणी भोसले यांचे बैंक खातेवरुन करुणा मुंडे यांच्या एच.डी.एफ.सी खाते क्रमांक ५०१००१७२०३६४९० यावर एकूण १८.४५,०००/- रुपये पाठवले. अशा प्रकारे एकूण २२.४५.०००/- रुपये रक्कम व १२,००,०००/- रुपये चे सोने करुणा मुंडे यांनी विश्वास संपादन करून व ते पैसे परत करण्याच्या अटीवर एकूण ३४ लाख ४५ हजार रुपये घेतले.

परंतु करुणा मुंडे यांनी ४० लाख रु पुर्ण जमा न झाल्याने माझ्या ओळखीचे विद्या अभंग व इतर तीन यांचे नावावर असलेला बंगला हा पक्षाचे कार्यालय म्हणून दाखविण्यासाठी साठेखत दस्त करून नोंदवुन घेतला व त्यात लाख १० हजार रुपये घेतल्याचे दाखविले, ९ लाख १० हजार पैकी दि. ११/२/२०२२ रोजी विद्या अभंग हिच्या अकाउंट वरून ५लाख रुपये करुणा मुंडे यांना परत केले व उर्वरीत रक्कम रोख स्वरुपात दिली. त्यानंतर करुणा मुंडे यांनी कुठल्याही प्रकारची पक्ष नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन न केल्याने मी त्यांना पैसे परत करण्यास सांगितले. त्यांनी प्रत्येक वेळी काहीना काही कारण सांगुन वेळ टाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझी खात्री झाली की करुणा मुंडे यांनी विश्वास संपादन करुन पक्ष उभारणेसाठी एकूण २२,४५,०००/- रुपये व १२ लाख रुपये किंमतीचे घेतलेले सोने परत न करता माझी फसवणुक केली आहे.

माझा तक्रारी अर्ज हा पोलीस अधिक्षक अहमदनगर यांना दिल्याचे करुणा मुंडे यांना समजल्याने त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी करुणा मुंडे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com