सोनईतील घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल

6 तोळे सोन्याचे, 30 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह रोख 13 हजाराची चोरी
सोनईतील घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल

सोनई (वार्ताहर) / sonai - जुना वांबोरी रस्त्यावर असलेल्या दत्तनगर परिसरात सोमवारी पहाटे दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांबाबत सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. संतोष कर्डिले यांच्या घरातून 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख 4 हजार रुपये चोरुन नेले तर घरातील चार मोबाईल तोडले.

दिपक जाधव यांच्या घरातील एकूण 4 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 30 ग्रॅम चांदीचे पैंजण व रोख 9 हजार असा ऐवज चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशाप्रकारे 5 तोळे 9 ग्रॅम सोन्याचे दागिने, 30 ग्रॅम चांदीचे दागिने, 13 हजार रुपयांची रोख रक्कम अशी चोरी झाली.

याबाबत पोलीस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की दत्तनगर परिसरात राहत असलेले संतोष मोहन कर्डीले (वय 37) यांनी फिर्याद दिली की सोमवारी पहाटे तीन वाजता किचनचा दरवाजा तोडून दोन चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी टॉमी व लोखंडी कत्तीचा धाक दाखवत अगोदर घरातील सर्व चार मोबाईल तोडून घरातील एक तोळा वजनाचे सोन्याचे नेकलेस, सहा ग्रॅमचे सोन्याचे कानातील वेल व रोख चार हजार रुपये चोरुन नेले.

शेजारी राहणारे दिपक नामदेव जाधव यांच्या घरीही चोरट्यांनी तेरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, नऊ ग्रॅम वजनाचे कानातील वेल, दोन ग्रॅम वजनाची नाकातील नथ, अकरा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, आठ ग्रॅम वजनाच्या कानातील बाळ्या, तीन भार वजनाचे चांदीचे पायातील पैंजण व नऊ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

चोर्‍या करताना चोरट्यांनी जवळच्या सर्व घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात भादवि कलम 392,457,380,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, सहाय्यक निरीक्षक रामचंद्र कर्पे, ज्ञानेश्‍वर थोरात यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास ज्ञानेश्‍वर थोरात हे करत आहे.

दोन महिन्यापूर्वी सोनईत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरु होता. याच परीसरात त्यावेळी चोरटे सीसीटिव्हीत हेरगिरी करताना दिसले होते. सोनई मधील महेश चौकातील युवकांनी पुढाकार घेत गावातील सर्व गल्लीतील युवकांचा सहभाग घेत ग्रामसुरक्षादलाची स्थापना केली होती. युवक, पोलीस व सुरक्षा कर्मचारी यांच्या गस्तीनंतर चोरट्यांनी गावातून पळ काढला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com