नुकसान भरपाई व अनुदानावरून रंगली श्रेयवादाची लढाई

नुकसान भरपाई व अनुदानावरून रंगली श्रेयवादाची लढाई

शेवगाव | शाम पुरोहित

अतिवृष्टी व महापुराने (Heavy rains and floods) बाधित झालेल्या शेवगाव (shevgoan) तालुक्यातील शेतक-यांना शासनाने सुमारे १६ कोटी ३५ लाख रुपयांची भरीव नुकसान भरपाई व अनुदान मंजूर केले असून त्यावरून तालुक्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे.

शेतक-यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य शासन दरबारी यशस्वी पाठपुरावा केल्याने आपल्या प्रयत्नातून ही फलनिष्पत्ती झाल्याचा दावा पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले (Dr. Kshitij Ghule) यांनी केला असून राज्य शासनाचे विषय मांडण्यासाठी आमदार तर केंद्राच्या विषयासाठी खासदार असतात. पंचायत समिती स्तरावर हा विषय नसतांना समाज माध्यमावर श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी नाव न घेता केल्याने शासकीय मदतीवरून श्रेय वादाची ही जुगलबंदी चांगलीची रंगली आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना लक्ष केले जात असल्याने ऐन दिवाळीत तालुक्याचे राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.

यंदाच्या वर्षातील खरीप हंगामात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात तालुक्यातील बहुतांशी गावात पावसाने चांगलाच हाहाकार माजविला. तालुक्यातील वरुर, भगूर येथील नंदिनी नदीने तर त्या पाठोपाठ तालुक्यातील पूर्व भागातील कांबीच्या नदीने रोद्ररुप धारण करून गावाला वेढा दिला. यात शेतक-यांच्या शेती व शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच मुक्या जनावराचीही प्राणहानी झाली. अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य वाहून गेले.

त्यानंतर आ.राजळे व सभापती डॉ घुले यांनी आपआपल्या समर्थकांसह पूरग्रस्त गावात जाऊन शेतक-यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांना धीर दिला. राज्याचे मदत व पुर्नवसन खात्याचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन महसूल व कृषी विभागाच्या संबंधित अधिका-यांना शेतक-यांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करून तालुक्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यासह सर्व संबंधितांच्या भेटीगाठी घेऊन आ. राजळे व सभापती घुले यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला. यावेळी कोकण व सांगली, सातारा या जिल्ह्याच्या धर्तीवर अधिक मदतीची मागणी करण्यात आली. त्याचीच फल निष्पत्ती म्हणून शासनाने तालुक्यासाठी १६ कोटी ३५ लाखाचा नुकसान ग्रस्त निधी मंजूर केला असून ही रक्कम तालुका प्रशासनाकडे प्राप्त झाली असून तालुक्यासाठी जिल्ह्यात सर्वाधिक निधीउपलब्ध झाला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात तालुक्यातील नुकसान ग्रस्त १२ गावांसाठी एकूण ५ कोटी ८९ लक्ष ९९ हजार ४५० रुपयाच्या निधी वितरणाचे नियोजन दिवाळी पूर्वी करण्याचे तालुका प्रशासनाचे नियोजन असल्याची माहिती तहसील कार्यालयातून सांगण्यात आली.

एकंदरीत तालुक्यातील महापूर व अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदतीचा हात देण्याचा जाहीर झालेला निर्णय काही प्रमाणात समाधानकारक असला तरी या बाबत राष्ट्रवादी (NCP) व भाजपच्या (BJP) मात्तबराकडून रंगलेली श्रेय वादाची लढाई तालुक्या बरोबर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. श्रेयवादातुन सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपणाच्या फ़ैरीमुळे तालुक्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे हे मात्र निश्चित.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com