प्रशासन सुधारण्यासाठी अभिप्रायांचा आधार

‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ अंतर्गतसर्वेक्षण
प्रशासन सुधारण्यासाठी अभिप्रायांचा आधार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने नागरिकांच्या जीवनमानाच्या गुणवत्तेबद्दल नागरिकांची धारणा जाणून घेण्यास सुरूवात केली आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ अंतर्गत नागरिक धारणा सर्वेक्षणाच्या माध्यमातून सोयी-सुविधांच्या विविध मुद्द्यांवर आधारीत प्रश्नांव्दारे नागरिकांना शहरातील जीवनमानाच्या दर्जाबाबत गुण देता येणार आहेत.

नागरिकांच्या अभिप्रायाच्या माध्यमातून नियोजनाव्दारे शहरी प्रशासन सुधारण्याचा प्रयत्न करणे आणि नागरिकांसाठी अधिक चांगली धोरणे तयार करणे, हा यामागचा उद्देश आहे. शहरातील शिक्षण, आरोग्य, जलव्यवस्थापन सुविधा, त्यांचा दर्जा, नागरिकांकडून वापरली जाणारी वाहने, नागरिक स्वतःच्या घरात राहतात की भाड्याच्या, शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण, भारनियमन, वायू प्रदूषण, स्वच्छता यासह रोजगाराच्या संधी, मनोरंजनाच्या सुविधा प्रवासाच्या सुविधा, राहण्यायोग्य सुरक्षित वातावरण, शहरात राहणे परवडते का, महापालिकेकडून मिळणारा प्रतिसाद, नागरिकांशी समन्वय आदी विविध मुद्द्यांवर 17 प्रश्न सर्वेक्षणात देण्यात आले आहेत.

मित्र, नातेवाईकांना शहरात येऊन राहण्यासाठी शिफारस करणार, अशा प्रश्नांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया केंद्र सरकार थेटपणे जाणून घेणार आहे. ‘ईज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत नागरिक धारणा सर्वेक्षणाची माहिती महानगरपालिकेच्या संकेस्थळावर तसेच नागरिक धारणा सर्वेक्षण वेबसाईटवर उपलब्ध आहे. यावरून सर्वेक्षणात सहभागी होता येणार आहे. सर्वेक्षणासाठी नगर महानगरपालिकेचा रेफरल कोड 802828 असा आहे. नागरिकांनी सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com