जायकवाडी तुडूंब ! 75 हजार क्युसेकने विसर्ग

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जायकवाडी तुडूंब ! 75 हजार क्युसेकने विसर्ग
File Photo

अस्तगांव (वार्ताहर)

नगर, नाशिकसह गंगापूर, वैजापूरमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने या भागातून जायकवाडी धरणात प्रचंड पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी या धरणातील पाणीसाठा 95 टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर या जलाशयातून खाली गोदावरीत 75 हजार 456 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. त्यामुळे आता नाशिक-नगरचे पाणी नको म्हणण्याची वेळ मराठवाड्यावर आली आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह धरणांच्या पाणलोटात मोठ्या पावसाचे धुव्वाधार आगमन झाल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने काल नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 45082 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. रात्री 9 वाजता तो 29609 क्युसेकवर आला होता.

पावसाने काहीशी उसंत दिल्याने नवीन पाण्याची आवक मंदावल्याने हा विसर्ग दुपारी 3 वाजता 35 हजार 617 क्युसेकवर आणण्यात आला. जायकवाडी जलाशयातील 95 टक्के साठा झाल्यानंतर या जलाशयातून 18 दरवाजांमधून विसर्ग काल सकाळी 10 वाजता विसर्ग करण्यास सुरुवात झाली. काल सायंकाळी 7 वाजता या धरणात 1 लाख 900 क्युसेकने नवीन पाणी दाखल होत होते. तर या धरणातून खाली गोदावरीत 66 हजार 24 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. 46 वर्षांत 22 वेळा हे धरण ओव्हरफ्लो झालेले आहे.

दारणातून 7408 क्युसेक, गंगापूर मधून 10521 क्युसेक, आळंदीतून 120 क्युसेक, कश्यपीतून 2150 क्युसेक, वालदेवीतून 599 क्युसेकने विसर्ग सुरू होता. नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या मुक्त पाणलोटातही ओढे नाले यांचे पाणी दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून काल सकाळी 24712 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग तासाभरात 35 हजार 617 क्युसेकवर नेण्यात आला. नंतर तो 45082 क्युसेकवर स्थिर ठेवण्यात आला. या विसर्गामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहु लागली. मार्गातील अनेक केटीवेअर च्या भिंतीवरुन असलेले रस्ते पाण्याखाली गेले. पुरजन्य परिस्थिती काही काळ दिसुन आली. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने पुन्हा विसर्ग 35617 क्युसेकवर आणण्यात आला आहे. काल सायंकाळी 7 वाजता हा विसर्ग स्थिर होता. नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडूंब भरले आहेत. गंगापूर समुहातील गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी हे तिनही धरणातून विसर्ग सुरु आहे.

खाली जायकवाडी जलाशयात मराठवाड्यातील धुव्वाधार पावसाने मोठी आवक होती. त्याभागात पावसाचे धुमशान बघायला मिळाले. वैजापूर, गंगापूर भागातील अनेक लहान मोठे तलाव फूटून पाणी गोदापात्रात दाखल झाले. मराठवाड्यातील अन्य ठिकाणचे पाणीही मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने या जलाशयात दिवसभरात मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक झाली. काल सकाळी 6 वाजता या धरणात 61894 क्युसेकने आवक होत होती. दिवसभरात त्यात मोठी वाढ झाली. काल सायंकाळी 7 च्या आकडेवारी नुसार जायकवाडीत 1 लाख 900 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. हे धरण 7 वाजता 98.24 टक्के भरले होते. मागील वर्षीही हे धरण आजच्या तारखेला 98 टक्कावर होते. या धरणातुन 66 हजार 24 क्युसेकने विसर्ग सुरु होता. या धरणाचे 18 दरवाजे यासाठी साडेतीन फुटांनी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाच्या खाली जायकवाडीला पुरजन्य स्थिती आहे.

काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासातील धरणांचा परिसर व गोदावरी कालव्यांवरील पाऊस असे- पाऊस मिमी मध्ये- दारणा 30, मुकणे 38, वाकी 55, भाम 52, भावली 106, वालदेवी 12, गंगापूर 184, कश्यपी 96, गौतमी गोदावरी 90, कडवा 12, आळंदी 65, नाशिक 53, घोटी 47, इगतपूरी 109, त्र्यंबक 92, अंबोली 154, देवगाव 125, ब्राम्हणगाव 84, कोपरगाव 75, पढेगाव 92, सोमठाणा 42, कोळगाव 65, सोनेवाडी 56, शिर्डी 59, राहाता 35, रांजणगाव 58, चितळी असा पाऊस नोंदला गेला आहे.

Related Stories

No stories found.