टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी 93 अर्ज दाखल

माघारीसाठी गावपुढार्‍यांना डोकेदुखी
टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी 93 अर्ज दाखल

टाकळीभान (वार्ताहर) -

श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल बुधवारी अर्ज

दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 17 सदस्य निवडीसाठी विक्रमी 93 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुकांच्या उमेदवारी अर्जाचे रेकॉर्ड यंदा मोडित निघाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झालेली दिसून येते. गावपुढार्‍यांना मात्र माघारीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

तालुक्याच्या राजकारणाला दिशा देणारी टाकळीभान ग्रामपंचायतीची सत्ता आजपर्यंत राहिलेली असल्याने या ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळेच तालुक्यासह जिल्ह्यातील व राज्यातील नेत्यांचेही येथील निवडणुकीकडे सातत्याने लक्ष राहिलेले आहे. गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी पदाधिकार्‍यांनी विकास कामे करीत असताना काही प्रमाणात दुजाभाव झाल्याचा आरोप विरोधकांकडून झाला असल्याने ज्या प्रभागावर अन्याय झाला त्या प्रभागात सत्ताधार्‍यांविरोधात नाराजीचा सूर असल्याने इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हातात हात घालून सत्ता काबीज करणारे माजी सभापती नानासाहेब पवार व माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाचे ज्ञानदेव साळुंके, मंजाबापू थोरात यांनी आ. कानडे-ससाणे गटाला सोबत घेत पवारांपुढे आव्हान उभे केले आहे.

काल बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पारंपारीक पध्दतीने व वेळ वाढवून दिल्याने अनेकांना दिलासा मिळाला. त्यामुळे कागदपञाची अपुर्तता आसणार्‍या इच्छुकांना छाननीपर्यंत संधी मिळाल्याने अधिकचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आज अखेर ग्रामविकास मंडळाकडून एकूण 39 अर्ज दाखल झाले आहेत तर लोकसेवा महाविकास आघाडीकडून 48 तर 3 इच्छुकांनी प्रभाग 1 व 6 मधून स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. यंदाच्या निवडणुकीत कुटुंबा-कुटुंबातील व्यक्ति एकमेकासमोर उमेदवारी करून एकमेकांना आव्हान देत आहेत. विद्यमान अनेक सदस्यांना उमेदवारीत अर्धचंद्र मिळालेला आहे. विद्यमान सरपंच व उपसरपंचही या निवडणुकीपासून दूर गेले आहेत. प्रभाग 6 मधून अशोकचे संचालक व माजी सभापतींचे सुपुत्र यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये सरपंचपद असलेल्या प्रभाग 5 मधूनही सामना रंगणार आहे. प्रभाग 4 मध्ये मगर व पटारे या दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांसमोर दंड थोपटत आहेत. प्रभाग 3 मध्ये कान्हा खंडागळे यांनी गेल्या दोन निवडणुकीत वर्चस्व ठेवल्याने त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार झुलवणार का हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रभाग 2 मधून प्रतिनिधीत्व करणारे राजेंद्र कोकणे व उपसरपंच पाराजी पटारे यांनी माघार घेतल्याने या प्रभागात दोन्ही गटाकडून नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग 1 हा माजी सभापती नानासाहेब पवार यांचा बालेकिल्ला असल्याने पवार या निवडणुकित किल्ला शाबुत ठेवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काहीही असले तरी वाढलेली इच्छुकांची संख्या ही अर्ज माघारी साठी दोन्ही गटांना डोकेदुखी ठरणार आहे. नाराजांची मनधरणी करण्यात गावपुढारी अपयशी ठरले तर तिसरी आघाडी जन्माला येऊ शकते असाही काही जाणकारांचा व्होरा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com