9 गावांबाबतचा निर्णय अन्यायकारक

ग्रामस्थांचे अप्पर पोलीस अधिक्षकांना निवेदन
9 गावांबाबतचा निर्णय अन्यायकारक

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

आश्वी पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या 9 गावांना तालुका पोलिस स्टेशनला जोडण्याचा शासनाचा निर्णय हा अन्यायकारक असून, याबाबत फेरविचार व्हावा, अशी मागणी या गावातील ग्रामस्थांनी अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात योग्य निर्णय न झाल्यास या गावातील नागरीक शासनाच्या अन्यायकारक निर्णया विरोधात तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेली 9 गावे ही आश्वी पोलिस ठाणे हद्दीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या गावांचा भौगोलिक विचार करुन कार्यान्वित झालेल्या आश्वी पोलिस ठाण्याचा या गावांमधील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. सर्व गावांना जवळ येत असलेल्या या पोलिस ठाण्यामुळे गुन्हेगारीला आळा बसला. ही वस्तुस्थिती असताना तसेच कुणाचीही मागणी नसताना केवळ मंत्र्यांच्या दबावापोटी पोलिस प्रशासनाने जाणिवपूर्वक रहिमपूर, कनोली, मनोली, कनकापूर, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, निंबाळे, हंगेवाडी, जोर्वे ही गावे संगमनेर तालुका पोलिस ठाण्याला जोडण्यासाठी हालचाली सुरु केल्या. पोलिस प्रशासनाचा हा निर्णय या सर्व गावांवर अन्यायकारक तर आहेच परंतू भौगोलिकदृष्ट्याही तो सोयीचा नाही आणि पोलिस प्रशासनासही यंत्रणा राबविण्याच्या दृष्टीने योग्य नसल्याची बाब विचारात घेण्यात आली नसल्याचे या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे डॉ. दिपाली काळे, पोलिस उपअधिक्षक राहुल मदने यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

आश्वी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गावे तालुका पोलिस स्टेशनला जोडण्याचा निर्णय झाल्यानंतर या भागातील गुन्हेगारी पुन्हा वाढली आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती लक्षात घेवून सदर गावे आश्वी पोलिस स्टेशनच्या हद्दीतच समाविष्ट ठेवावीत अशी मागणी या गावातील प्रतिनिधींनी काल पोलिस अधिकार्‍यांची भेट घेवून निदेवनाद्वारे केली आहे. ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

याप्रसंगी भाजयुमोचे सचिन शिंदे, रविंद्र गाडे, कनोली सरपंच भाऊसाहेब पवार, उपसरपंच राधाकिसन काकड, मंगेश वर्पे, ज्ञानेश्वर वर्पे, गौतम जगताप, अर्जुन हळनोर, सचिन खेमनर, मच्छिंद्र भागवत, बाबासाहेब ठोसर, गणपतराव शिंदे, निलेश वर्पे, अंकुश पचपिंड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com