तपासले ४६ लाख दस्त, सापडल्या ८५ हजार कुणबीच्या नोंदी

यंदाची दिवाळी नोंदी शोधण्यातच जाणार
तपासले ४६ लाख दस्त, सापडल्या ८५ हजार कुणबीच्या नोंदी

अहमदनगर (प्रतिनिधी)

मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबीचा इम्पिरिकल डेटा शोधण्याची मोहीम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. यात शुक्रवार अखेर तब्बल ८५ हजार प्रमाणपत्रांच्या नोंदणी जिल्हा प्रशासनाच्या हाती आल्या आहेत. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदणी शोधण्यासाठी तब्बल ४६ लाख दस्त तपासण्यात आले आहेत. दुसरीकडे सध्या दिवाळी सणाची धामधुम सुरू असली तरी जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यांच्यावर कुणबी नोंदी सोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याने त्यांच्या दिवाळीवर यंदा पाणी फिरणार असल्याचे चित्र आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आता हिच मोहिम संपूर्ण राज्यात ही राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर नगर जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विभाग व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात सोमवार (दि. ६) तारखेपासून सर्व शासकीय विभागात कुणबी नोंदणी शोधण्यात येत आहेत. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षामार्फत शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहाय्यक आयुक्त (नगर पालिका प्रशासन), तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांमधील शाळा सोडल्याच्या रजिस्टरमधील नोंदणी तपासल्या असून यात १२ हजार १४५ जणांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. तर जात प्रमाणपत्र वैधता विभागाने ५६ हजार जणांना कुणबीचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अन्य शासकीय विभागासह जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत ८५ हजार जणांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदणीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. यासह महसूल, पोलीस यंत्रणा, खरेदी दस्तावेज, शहरातील वस्तूसंग्रहालय, जन्म-मृत्यूच्या नोंदीच्या रेकॉर्ड यांचा शोध घेण्यात येत असून शासकीय विभाग कुणबी नोंदी शोधण्यासाठी कामाला लावण्यात आले आहे.

२४ लाख दाखले तपासले

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गेल्या पाच ते सहा दिवसात तब्बल २४ लाख १२ हजार ९६१ शाळा सोडल्याचे दाखले तपासले आहेत. यात १९४८ ते १९६९ या कालावधीचा समावेश असून या कालावधीत ११ हजार ७७६ जणांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कुणबीची नोंद आहे. तर १९६९ या एका वर्षात ३६९ जणांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर कुणबीची नोंद आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com