अहमदनगर | Ahmedagar

शहरातील एका उच्चशिक्षित व्यक्ती बरोबर सोशल मीडियावर मैत्री करून हर्बल प्रॉडक्ट खरेदीच्या बहाण्याने 70 लाखाला गंडा घालणार्या

नायजेरीन व्यक्तीला नगर सायबर सेल पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. इदू केस्टर उर्फ इब्राहीम (वय- 33 मूळ रा. नायजेरिया, हल्ली रा. आया नगर, दक्षिण दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

अमेलिया स्मिथ असे नाव सांगणार्या व्यक्तीने नगर शहरातील एका उच्चशिक्षित व्यक्तीबरोबर सोशल मीडियावरून मैत्री केली. भारतातील हर्बल प्रोडॉक्ट कंपनीकडून आर्युवेदिक कच्चा माल खरेदी करण्याचा बहाणा त्याने केला. दिल्ली, वाराणसी, अरूणाचल प्रदेश येथील विविध बँकेचे 6 खात्यांची खोटी ओळख त्याने फिर्यादी यांना सांगितली. फिर्यादी यांचा विश्वास बसल्याचे पाहून खरेदी प्रक्रिया सुरू केल्याचे भासवत विविध कारणांसाठी पैसे उकळण्यास सुरवात केली. सरकारी कार्यालयांच्या बनावट ईमेल आकाऊंटवरून बनावट कागदपत्रे पाठवून आरोपी विश्वास संपादन करीत राहिला. विविध कारणांसाठी त्याने फिर्यादीकडून 70 लाख, 87 हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपास सुरू केला.

आरोपींनी फिर्यादीशी ज्या नंबरवरून संपर्क केला, ज्या बँक खात्यांत पैसे भरण्यात आले अशा गोष्टींची पोलिसांनी चौकशी सुरू केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, सहाय्यक निरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, दिंगबर कारखेले, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरूण सांगळे, पुजा भांगरे या सायबर सेलच्या पथकाने गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण करून पुरावे आणि आरोपीचा ठावठिकाणा मिळविला. यातील संशयित आरोपी दिल्ली परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या पथकाने दिल्लीत सलग 7 दिवस तळ ठोकला. आरोपी वेळोवेळी राहण्याचे ठिकाण बदलत होता. या पथकाने तेथे स्थानिकांची मदत घेऊन तपास सुरू केला. आरोपी राहत असलेल्या अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या भागात घराजवळ पाळत ठेवली. काही काळाने आरोपी त्याच्या घरी आला. पोलिसांनी लगेच तेथे छापा टाकून त्याला पकडले.