नगरमध्ये ऑक्सिजन अभावी 7 रुग्णांचा मृत्यू : पोलिसांकडून चौकशी सुरू

नातेवाईकांचा आरोप : प्रशासनाचे कानावर हात
नगरमध्ये ऑक्सिजन अभावी 7 रुग्णांचा मृत्यू : पोलिसांकडून चौकशी सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)

एकीकडे जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत असताना दुसरीकडे एमआयडीमधील खासगी ऑक्सिजन प्लंटरसमोर टँकरच्या रांगा लागलेल्या आहेत. हे चित्र ऑक्सिजन टंचाई असल्याचे दर्शवित आहे.

याच पार्श्‍वभूमीवर नगर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सात करोना बधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब आज सकाळी समोर आली. हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याचा दावा रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. मात्र हॉस्पिटल व प्रशासनाने हा दावा फेटाळला आहे.

Title Name
'ते' 7 मृत्यू : मनपा आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन चौकशीसाठी पोहचले
नगरमध्ये ऑक्सिजन अभावी 7 रुग्णांचा मृत्यू : पोलिसांकडून चौकशी सुरू

नगर शहरातील स्टेशन रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री सात करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मयतांच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन न मिळाल्याने संबंधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. तर काल जिल्ह्यात मुबलक ऑक्सिजन आलेला होता. यामुळे झालेले मृत्यू हे ऑक्सिजनमुळे झाले नसावे, अन्य कारणे असू शकतात, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला असून याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला.

करोना काळात उपचारासाठी नगर जिल्ह्यासाठी रोज 60 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यात सोमवारी 20 तर मंगळवारी 50 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याने तो ऑक्सिजन अपूर्ण पडत आहे. काल उपलब्ध झालेला 50 टन ऑक्सिजन जिल्हा रुग्णालय व शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांना वाटप करण्यात आल्याचे सांगण येत आहे. मात्र, शहरातील एका हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी सात करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून या मृत्यूबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. यामुळे संभ्रम आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत अधिकृत कोणताच खुलासा केलेला नाही. यामुळे गाेंंधळाची स्थिती आहे.

पोलीस बंदोबस्त, चौकशी सुरू

नगरमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी सात करोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्णालयात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून घटनेची चौकशी सुरू केली आहे.

जिल्ह्यात काही दिवसापासून करोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची टंचाई भासत आहे. अनेक खाजगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपला आहे. परंतु रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातून अशा घटना घडत आहेत.

शहरातील अशाच एका हॉस्पिटलमध्ये करोनाबाधितांवर उपचार सुरू असताना संबंधित हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पातळी घटली. त्यातून रुग्णांना ऑक्सिजन पुरेसा मिळाला नाही. ऑक्सिजनवर असलेल्या काही रुग्णांचा मृत्यू झाला. यातील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्यानुसार संबंधित हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com