कोल्हार हाणामारी प्रकरणात ७ जणांना अटक; ५ जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी

लोणी पोलीस ठाण्यावर विविध संघटनाचा मोर्चा
कोल्हार हाणामारी प्रकरणात ७ जणांना अटक; ५ जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हार (वार्ताहर)

कोल्हार बुद्रुक येथील अंबिकानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारी प्रकरणात १० जणांपैकी ७ जणांना पोलिसांनी अटक केली. काल त्यांना राहाता न्यायालयात हजर केले असता, त्यातील ५ जणांना दि. २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी तसेच अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान काल शुक्रवारी लोणी पोलीस ठाण्यावर आदिवासी भिल्ल तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने मोर्चा नेऊन आरोपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली.

गुरुवारी सकाळी कोल्हार बुद्रुक येथे अंबिकानगर भागात छोट्या मुलीला युवकाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये एका गटाने तलवारी व लाकडी दांड्यांचा वापर केल्याने प्रकरण अत्यंत गंभीर बनले. त्यातल्या त्यात सदर घटनेचे मोबाईल व्हिडीओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण आणखी तापले. पोलीस उपाधीक्षक संजय सातव घटनेचा यांनी प्रत्यक्ष येऊन आढावा घेतला.

रात्री उशिरा घटनेसंदर्भात लोणी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरुद्ध फिर्यादी दाखल करण्यात आल्या. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने दोन्ही गटांतील एकूण १० जणांविरोधात गुन्हा नोंदविला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी यातील ७ आरोपींना अटक केली.

काल शुक्रवारी ७ जणांना राहाता न्यायालयात हजर केले असता जब्बार एजाज खान, अफरोज असलम शेख, सलमान चाँद खान, आबिद जमशेद सय्यद, शाहरुख चाँद शेख या ५ जणांना दि. २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याचप्रमाणे कार्तिक शंकर बर्डे आणि विशाल भाऊसाहेब बर्डे या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी यांनी सांगितले.

काल सकाळी लोणी पोलिसांचा मोठा ताफा अतिरिक्त फोर्स घेऊन कोल्हार बुद्रुक येथील अंबिकानगरमध्ये दाखल झाला. त्यांनी आरोपींना सोबत आणून सर्च ऑपरेशन राबविले. आरोपींच्या घरातून तलवारी, कुऱ्हाड यासारखी शस्त्रे हस्तगत करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी सांगितले.

दरम्यान आदिवासी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत काल शुक्रवारी लोणी पोलीस ठाण्यावर आदिवासी, भिल्ल, मातंग, दलित तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने भव्य मोर्चा नेण्यात आला. मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने महिला-पुरुष, युवक सहभागी होते. .

मोर्चा लोणी पोलीस ठाण्यात धडकल्यानंतर कोल्हार येथील आदिवासी समाज बांधवांना झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांकडून वास्तववादी गुन्हे दाखल होणे अपेक्षित असल्याचे म्हणणे मांडण्यात आले. जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याने आरोपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Related Stories

No stories found.