लॉकडाऊनमध्ये जुळल्या 600 रेशीमगाठी

महावीर बायोडाटा बँकेने केले असे काही...
लॉकडाऊनमध्ये जुळल्या 600 रेशीमगाठी

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

चांगला जोडीदार ही प्रत्येकाची आयुष्याकडून असलेली अपेक्षा. त्यासाठी एखादा मार्गदर्शक, मदत करणारा धावून आला तर कोणाला नको असेल! महावीर बायोडाटा बँक (Mahavir Biodata Bank) असेच काम गेल्या काही वर्षापासून करत आहे. करोना (Corona) काळात लॉकडाऊन (Lockdown) असल्याने विवाह (Marriage) जुळविण्यात अनेक अडचणी असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology) वापर करून त्यांनी तब्बल 600 रेशीमगाठी बांधल्या. गेल्या 8 वर्षात ही संख्या 2 हजारांवर पोहचली आहे. ‘सोच बदलिये..रिश्ते बनाईये’ ही संकल्पना कमालीची यशस्वी झाली, याचा आनंद या मोहिमेचे सुत्रधार अनिल मेहेर (Anil Meher) व्यक्त करतात.

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. मात्र हा योग जुळुन येण्यासाठी प्रयत्न जमिनीवरच करावे लागतात. त्यातही आताचा काळ प्रचंड धावपळीचा आहे. एकमेकांकडे जाणे येणे कमी झाले आहे. त्यामुळे घरातील उपवर मुलामुलींचे विवाह जुळवताना स्थळ शोधण्यापासून पालकांना कसरत करावी लागते. समाजातील या वास्तवाची जाणीव झाल्याने अनिल मेहेर यांनी उत्स्फूर्तपणे हे काम हाती घेतले. 13 वर्षांपूर्वी ते नगरमध्येच महावीर भवन (Mahavir Bhawan Ahmednagar) येथे दररोज ठराविक वेळी थांबून मुलामुलींचे बायोडाटा (Biodata of boys and girls) जमा करायचे. पुढे 2016 पासून व्हॉटसअप (WhatsApp) सारख्या माध्यमाचा उपयोग करून महावीर बायोडाटा बँकेचे ग्रुप (Mahavir Biodata Bank WhatsApp Group) तयार केले. 2017 पासून हे ग्रुप जोराने धावायला लागले. आज जवळपास अडीच हजारांहून अधिक लोक त्यांच्या ग्रुप्समध्ये आहेत. यात विवाह इच्छुकांचे फोटो, बायोडाटा टाकला जातो. अनुरुप अशा जोडीदाराचा शोध घेतला जातो. विवाह जुळल्यानंतर संबंधित लोक ग्रुपमधून बाहेर जातात व तितकेच लोक नव्याने ग्रुपमध्ये दाखल होतात. या सर्व ग्रुपमध्ये समन्वय ठेवण्याचे काम मेहेर सातत्याने करतात.

ही उपक्रम राबवताना मेहेर यांनी अनेक घटस्फोटीतांनाही (divorcees) नव्याने वैवाहिक जीवनाचा आनंद मिळवून दिला आहे. दोन वेळा घटस्फोट झालेल्या व दोन मुले पदरी असलेल्या महिलेचा विवाह त्यांच्या माध्यमातून प्रथमच लग्न करणार्‍या सुखवस्तू कुटुंबातील मुलाशी जुळवून दिला. आज ती महिला आनंदाने संसारात रमली आहे. याशिवाय एका घटस्फोटीत व सी.ए. (CA) असलेल्या मुलीचा विवाहही त्यांनी प्रथम वराशी जुळवून दिला.

अनिल मेहेर जवळपास 13 वर्षांपासून कुठल्याही अपेक्षेविना केवळ आत्मानंद मिळण्यासाठी बायोडाटा बँक चालवित आहे. स्वत:चा मोठा व्याप असलेला व्यवसाय सांभाळून ते केवळ सामाजिक बांधिलकीतून हे काम करतात. यासाठी त्यांना पत्नी अर्चना मेहेर तसेच मुलं अंकुश, अमृता, अंकिता यांचेही सहकार्य लाभते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची कल्पना मुलांमुळेच शक्य झाल्याचे ते सांगतात. याशिवाय प्रवीण बोरा (Pravin Bora), सतीश कर्जतकर (Satish Karjatkar), संजय गांधी (Sanjay Gandhi), ऍड.नरेश गुगळे (Naresh Gugale) या उपक्रमात त्यांना साथ देतात.

ऑनलाईन भेट

पूर्वी एकमेकांच्या घरी जावून पाहण्याचा, कुंडली जुळविण्याचा कार्यक्रम व्हायचा. यातही अनिल मेहेर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. आता झुम मिटिंगव्दारे (Zoom Meeting) मुले मुली एकमेकांशी थेट संवाद साधतात. तसेच बायोडाटाबरोबर स्वत:ची दोन चार मिनिटांची व्हिडिओ क्लिपही ()Video Clip पाठवतात. त्यामुळे दोन्ही बाजूंचा खूप वेळ वाचतो. नव्याने नातेसंबंध तयार होताना मनात बर्‍याच शंका असतात. यासाठी स्वत: मेहेर मध्यस्थी करून दोन्ही कुटुंबांना एकत्र आणतात. मुलामुलींना समोरासमोर बसवून त्यांचे समुपदेशन करतात. एकदा रेशीमगाठ जुळल्यावर त्या कुटुंबांच्या चेहर्यावर झळकणारा आनंदच माझ्यासाठी अनमोल असल्याचे ते आवर्जून सांगतात.

पालकांच्याच अपेक्षा अधिक

दोन हजारांहून अधिक विवाह जुळविण्यात महत्त्वाची भूमिक बजावणारे अनिल मेहेर विवाह संस्था व समाजाच्या मानसिकेतेवरही मार्मिक बोट ठेवतात. आताच्या काळात मुलामुलींपेक्षा पालकच अधिक अपेक्षा ठेवतात. मुलांवर निर्णय लादण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मुलामुलींची एकमेकांना पसंती असतानाही विवाह जुळत नाही. पालकांनीही आपली पारंपरिक मानसिकता बदलायला हवी, असा सल्ला मेहेर देतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com