संगमनेर तालुक्यासाठी 6 रुग्णवाहिका

संगमनेर तालुक्यासाठी 6 रुग्णवाहिका

संगमनेर (प्रतिनिधी) - करोनाच्या संकटात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील नागरिकांना तातडीच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. रुग्णांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्याकरिता जिल्हा परिषदेच्या निधीतून तालुक्यातील निमगाव जाळी, चंदनापुरी, जवळेबाळेश्‍वर, घारगाव, जवळे कडलग व धांदरफळ खु. येथील आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.

यशोधन संपर्क कार्यालयात या सहा रुग्णवाहिका यांचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीतभाऊ थोरात, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, सभापती शंकरराव खेमनर, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, जि.प. सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, महेंद्र गोडगे, मिलिंद कानवडे, सिताराम राऊत, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, बेबीताई थोरात, निशाताई कोकणे, अर्चनाताई बालोडे, इंद्रजीत खेमनर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, अ‍ॅड. सुहास आहेर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, महेश वाव्हळ, अभिजीत बेंद्रे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. यामध्ये विविध आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणार्‍या गावांसाठी रुग्णवाहिका अत्यंत गरजेची आहे. यामुळेच नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार चंदनापुरी, घारगाव, जवळेबाळेश्‍वर, धांदरफळ खुर्द, निमगाव जाळी, जवळेकडलग या सहा आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिका त्या परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. अजूनही करोनाचे संकट गेले नाही या काळात प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. येणारी तिसरी लाट रोखण्यासाठी शासकीय नियमांचे प्रत्येकाने पालन करावे. मास्क लावणे अनिवार्य असून कोणीही बाहेर विनाकारण फिरू नका. व कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्या जितक्या लवकर उपचार होतील त्यात तितक्या लवकर आपण करोनातून बरे होऊ असे आमदार डॉ. तांबे म्हणाले.

इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले, तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर येथील जनसामान्यांच्या आरोग्याकरिता नामदार बाळासाहेब थोरात सातत्याने काळजी घेत आहेत. या रुग्णवाहिके मुळे त्या त्या भागातील नागरिकांना मोठा लाभ होणार असून तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांनी प्रयत्न केले आहेत. करोनाचे संकट रोखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ही वाढ थांबवण्यासाठी प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन करा.

सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, करोना लाट कमी झाली म्हणून लगेच घरगुती समारंभ कोणीही करू नये. अनेक जण एकत्र येतात. आणि घरगुती समारंभ करतात ते अत्यंत चुकीचे आहे. करोना रोखण्यासाठी प्रशासन काम करत आहे. त्याला नागरिकांनी साथ द्या असे त्या म्हणाल्या. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व अ‍ॅम्बुलन्स च्या ड्रायव्हरचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com