अहमदनगर (प्रतिनिधी) -

सावेडी नाट्यगृहासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

गत 8 वर्षापासून सावेडी नाट्यगृहाचे काम प्रलंबित आहे. 2011 मध्ये या नाट्यगृहासाठी दोन कोटी रूपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्यात आले होते. आसनक्षमता आणि कामाची व्यापती पाहता त्यासाठी 11 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. महापालिकेने शासनाकडून मिळणार्या इतर अनुदानातून काही रक्कम नाट्यगृहासाठी दिली. तरीही नाट्यगृहाचे बांधकाम पूर्णत्वासाठी आणखी 7 कोटी रुपयांची गरज होती. आ. संग्राम जगताप यांनी त्यासाठी निधी मिळावा याकरीता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला.

त्याला आज यश मिळाले. राज्यस्तरीय आणि विभागीय जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज शनिवारी मंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत नगरच्या नाट्यगृहासाठी जिल्हा नियोजन मंडळात पाच कोटी रूपयांची तरतूद करण्याचे आदेश मंत्री पवार यांनी दिले. हा निधी तत्काळ वितरीत करावा असेही आदेश दिले. यामुळे रखडलेले सावेडी नाट्यगृहाचे काम आता तडीस जाणार आहे.

नाट्यकर्मींसह नगरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सावेडी नाट्यगृहासाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. आता लवकरच हे नाट्यगृह पूर्ण होऊन त्याचा लोकार्पण सोहळा केला जाईल.

- आ. संग्राम जगताप.