46 मेट्रीक टन ऑक्सिजन व 25 हजार लसी उपलब्ध

विशाखपट्टणमचे टँकर मिळाले साठा मात्र एका दिवसाचाच
46 मेट्रीक टन ऑक्सिजन व 25 हजार लसी उपलब्ध
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेल्वेने राज्यात दाखल झालेल्या ऑक्सिजनचे दोन टँकर नगरला आले आहेत. शनिवारी सायंकाळी या टँकरमधील ऑक्सिजन जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर एमआयडीसी येथील प्लांटमध्ये साठविण्यात आला. यासह तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यासाठी 25 हजार करोना लसी प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिवसभरात जिल्ह्यासाठी नाशिक येथून दोन ऑक्सिजन टँकर नगरला पोहचले. हे टँकर रेल्वेने विशाखापट्टणम येथून आलेले आहेत. या टँकरमध्ये 24 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध झाले आहे. यासह पुण्यातील चाकन येथून 10 टनाचा टँकर आणि रायगड जिल्ह्यातील प्रकल्पातून 12 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा झालेला आहे.

जिल्ह्यात दिवसभरात 46 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली. मात्र, नगर शहराला दैनंदिन 50 मेट्रीक टन आणि उर्वरित जिल्ह्यात 10 मेट्रीक टन असा 60 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून शनिवारी उपलब्ध झालेला साठा हा 24 तासांत वापरला जाणार असल्याने पुन्हा ऑक्सिजनसाठी प्रशासनाला पाठपुरावा करावा लागणार आहे.

दरम्यान, तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शनिवारी रात्री उशीरा जिल्ह्यात करोनाची लस दाखल झाली. यामुळे रविवारी या लसीचे वितरण होवून सोमवारपासून लसीकरण मोहिम सुरू होणार आहे. जिल्ह्यात 165 लसीकरण केंद्र असून त्या ठिकाणी एका दिवसात किमान 15 हजार जणांच्या लसीकरणाची क्षमता आहे. यामुळे आलेली लस दोन दिवसात संपणार आहे. त्यानंतर आरोग्य विभागाला पुन्हा लसीसाठी पाठपुरावा करावा लागणार आहे.

1 मेच्या लसीकरणाबाबत मार्गदर्शनाची प्रतीक्षा

जिल्ह्यात 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. मात्र, आतापर्यंत याबाबत कोणतेच मार्गदर्शन आरोग्य विभागाला मिळालेले नाही. जिल्ह्यात 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या नागरिकांच्या लसीकरणासाठीच लसीचा तुटवडा असताना 1 मे पासून सुरू होणारे लसीकरण कसे करावे, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर आहे. तसेच या व्यापक लसीकरणासाठी केंद्राची संख्या वाढवावी लागणार असून त्याचे अद्याप नियोजन झालेले नाही. यामुळे गोंधळाचे वातावरण आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com