
अहमदनगर (प्रतिनिधी)
नगरजवळील खारेकर्जुने येथील संरक्षण विभागाच्या ‘केके रेंज’ मधील सुचित क्षेत्रातील (नोटिफाईड एरीया आर-2) 42225.83 एकर जमिनीच्या संपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला आर्मर्ड कॉर्प्स स्कूल अँड सेंटरने (एनसीसी अँड एस) सादर केला आहे. त्यामध्ये राज्य सरकारची 6028.57 एकर, वन विभागाची 13958.67 एकर व खासगी 22238.56 एकर जमीन आहे. खासगी जमीन राज्य सरकारमार्फत संपादन केल्यास त्याची भरपाई दिली जाईल. या संदर्भात 28 जानेवारी 2023 रोजी प्रस्ताव दिला होता. मात्र अद्याप त्यावर कोणतीही प्रगती झालेली नाही, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
या प्रस्तावावर लष्कर व जिल्हा प्रशासनाच्या काल, शुक्रवारी झालेल्या समन्वय बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आली. बैठकीस लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांसह जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, प्रांताधिकारी सुधीर पाटील, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.लष्कराच्या प्रस्तावात म्हटले की, शहरापासून 25 किमी. अंतरावर मनमाड रस्त्यावर केके रेंजचे संपूर्ण क्षेत्र ‘एसीसी अँड एस’च्या वापरासाठी राखीव आहे. याशिवाय हवाई दल, इन्फंट्री, डीआरडीओ या विभागांकडूनही त्याचा वापर केला जातो. केके रेंजचे प्रत्यक्ष सराव क्षेत्र म्हणून वापरले जाणारे 36,524.588 एकर (आर-1) 71,209.96 एकर (नोटिफाईड, आर-2 जानेवारी 2026 पर्यंत) व भविष्यात संपादन करायचे 28522 एकर (आर-3) असे तीन विभाग आहेत. आर-2 क्षेत्र 3 डिसेंबर 1969 मध्येच एसीसी अँड एसच्या संपादनासाठी आहे, हे राज्य सरकारने मान्य केले आहे. त्यामुळे दर पाच वर्षांनी ते नोटिफाईड करण्याचे मान्य केले आहे. त्याची मुदत 14 जानेवारी 2026 पर्यंत आहे. सुधारित प्रस्तावानुसार आर-2 क्षेत्रातील 42225.83 एकर क्षेत्र एसीसी अँड एस साठी संपादन करायचे आहे.
युध्द सराव क्षेत्रासाठी आर-2 क्षेत्रातील जमीन दर पाच वर्षांसाठी नोटिफाईड केली जाते. नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील ही जमीन आहे. तीन वर्षांपूर्वी या विषयावरून मोठे राजकीय वादंग निर्माण झाले होते. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली होती. दोन्ही बाजूने हा विषय वरिष्ठ पातळीवर नेण्यात आला होता. नंतर तो बासनात गेला. आता लष्कराच्या प्रस्तावाने श्रेयवाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लष्कराचा केके रेंजसाठी जमीन संपादनाचा प्रस्ताव तसेच झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लष्कराने जमीन संपादनाची मागणी केली आहे. संपदानाचे क्षेत्र मोठे असल्याने या संदर्भात राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले जाईल. याशिवाय लष्कराने भिंगारमधील पाथर्डी रस्त्यावर, कापूरवाडीकडे रणगाडे जाण्यासाठी, रस्त्यासाठी 14497 चौरस मीटर जमीन संपादनाचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. रणगाडे वाहतूकसाठी लष्कराने पूर्वीच 523.35 एकर जमीन संपादनाचा प्रस्ताव सादर केलेला होता. तो मंत्रालयीन पातळीवर प्रलंबित आहे.