भेंडा परिसरातून बीड-गेवराईत लागवडीसाठी दररोज जातोय 400 टन ऊस

भेंडा परिसरातून बीड-गेवराईत लागवडीसाठी दररोज जातोय 400 टन ऊस

सुखदेव फुलारी

नेवासा - तालुक्यातील भेंडा, देवगाव, देडगाव परिसरातील ऊस बेण्याला बीड-गेवराई मधील शेतकर्‍यांची मोठी मागणी असून भेंडा परिसरातील भुईकाट्यावर (वे-ब्रिज) वजन करुन दररोज सुमारे 400 टन ऊसाची बेण्यासाठी विक्री होत आहे.

कायमच दुष्काळी समजल्या जाणार्‍या बीड जिल्ह्यात यावेळी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बीडसह गेवराई तालुक्यातील गावातील शेतकर्‍यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे. भेंडा, तेलकुडगाव, दहीगाव, देडगाव, देवगाव ही गावे ऊसाचे आगार म्हणून सर्वांना परिचित आहेत. उत्तम प्रतीचा ऊस उत्पादित करण्यात या गावातील शेतकर्‍यांचा हातखंडा आहे. त्यामुळे ऊस लागवड करताना शेतकरी सर्व प्रथम या गावातील ऊसाला प्राधान्य देतात.ऊस लागवडीसाठी बेणे निवडतांना ऊसाचे वय, गुणवत्ता, उगवण क्षमता हे निकष लावले जातात. हे सर्व निकष या गावतील ऊस बेण्यात असते. त्यामुळे ऊस बेणे विक्री-खरेदीकरीता भेंडा परिसरातील अखिलेश वे-ब्रिजवर येतात. दरदिवशी 400 टनाहुन अधिक ऊस येथे विक्रीसाठी येतो.ज्यांना बेणे हवे आहे ते शेतकरी याठिकाणी येतात आणि आपल्या मनपसंतीचे ऊस बेणे निवडून ते विकत घेतात. या ठिकाणाहून सध्या दररोज 400 टनांपर्यंत ऊसाची बेण्यासाठी विक्री होते.

सध्या भेंडा, कुकाणा, तरवडी, तेलकुडगाव, देडगाव, देवगाव, रांजणी या गावातून ऊस विक्री करिता येत आहे. बीड-गेवराई व नेवासा तालुक्यातील काही गावामधे बर्‍यापैकी पाऊस झाल्याने ऊस लागवडीला वेग आलेला आहे.श्‍वाश्‍वत उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून ऊस पीक लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल असतो. ऊस लागवड करताना 265 व 86032 या ऊस जातीला अधिक पसंती दिली जात आहे. त्यातल्या त्यात 265 ऊस लागवडीकडे शेतकर्‍यांच्या अधिक कल आहे.

बीड-गेवराईकडे गेल्या पाच सहा दिवसांपासून दररोज सुमारे 150 ते 200 टन ऊस बेण्यासाठी जात आहे. बीड जिल्हा व गेवराई तालुक्यातील शेतकरी स्वतःचे ट्रॅक्टर सोबत घेऊन येतात व बेणे पसंत करून घेऊन जात आहेत.

ऊस क्षेत्र वाढण्याची शक्यता

मागील गळीत हंगामात नेवासा व शेवगाव तालुक्यात सुमारे 50 लाख टना हुन अधिक उसाची उपलब्धता होती. एकूण 39.63 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप नेवासा-शेवगाव तालुक्यात ऊसाचे गाळप झाले. उर्वरित ऊस जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांनी नेऊन गाळप केला. सध्या दररोज 400 टन ऊस लागवडीसाठी जात असेल तर ऊसाचे क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे नुकत्याच बंद झालेले हंगामात तुटलेल्या ऊसाचे खोडवे व नवीन ऊस लागवड यामुळे पुढच्या गळीत हंगामात अतिरिक्त ऊसाचा प्रश्‍न उभा राहणार आहे.

बीड-गेवराईला जातो सर्वाधिक ऊस

गेल्या पाच-सहा दिवसांपासून बीड-गेवराई तील शेतकर्‍यांची ऊस बेण्याची मोठी मागणी वाढलेली आहे. दररोज 150 ते 200 टन ऊस बीड-गेवराईला जातो.265 व 86032 या दोन ऊस जातीला मागणी आहे.जागेवर 2400-2500 ते 2700-2800 प्रतिटन असा सध्याचा ऊस नेण्याचा भाव आहे.

- प्रमोद कावरे भूईकाटा मालक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com