
राहुरी | तालुका प्रतिनिधी
गेल्या महिन्यापासून कांद्याच्या भावाने तीन हजारी गाठल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते. मात्र, कालच केंद्र शासनाने काद्यांच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने कांद्याच्या भावात कमालीची घसरण होणार असल्याने राहुरी येथे बाजार समिती समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे म्हणाले, शेतकऱ्यांनी अनेक नैसर्गिक अडथळे पार करून कांद्याची लागवड केली.ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच कांदा काढणीच्या हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा काढलेला कांदा भिजला. तसेच काहींचा कांदा शेतातच सडला. या नैसर्गिक आपत्तीतही वारेमाफ खर्च करून पिकविलेला कांदा शेतकऱ्यांनी काढणी करून चांगला कांदा चाळीत भरला. आता कुठेतरी कांद्याच्या भावात सुधारणा होत असताना केंद्र शासनाने निर्यात शुल्कात वाढ करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप केले आहे. त्याचप्रमाणे काल खरेदी केलेल्या कांद्यालाही निर्यात शुल्क लागू केल्याने कांदा व्यापरीवर्ग हतबल झाला आहे. कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने कांद्याच्या भावात घसरण होणार असून यामुळे शेतकऱ्यांना कांदा पुन्हा रडविणार असल्याचे चित्र निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे
यावेळी सुनील इंगळे, सतीश पवार, विजुभाऊ डौले, जुगलकुमार गोसावी, सचिन गडगुळे, दिनेश वराळे, आनंद वने, सचिन म्हसे, प्रमोद पवार,रवींद्र निमसे, बाळासाहेब निमसे, संदीप शिरसाठ, बाबासाहेब चोथे, राहुल करपे आदींसह शेतकरी वर्ग उपस्थित होता.