अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना लसीकरणाची आज राज्यातील सर्व जिल्ह्यात रंगीत तालिम होत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने नियोजन केले आहे.

महापालिकेच्या तोफखाना आरोग्य केंद्रावर, जिल्हा परिषदेकडून वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणि जिल्हा रुग्णालयात आज ड्राय रन होईल. या तिन्ही ठिकाणी पूर्व तयारी झाली असून प्रत्येकी 25 लाभार्थ्यांची यासाठी निवड केली आहे.

केंद्र सरकारने करोना प्रतिबंधासाठी दोन लसींना मान्यता दिली. त्यानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात करोना लसीकरणाची रंगीत तालिम होत आहे. महापालिका प्रशासनाकडून तोफखाना येथील आरोग्य केंद्रावर तालिम होईल. त्यासाठी पाच लसीकरण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. वेटिंग रुम, लसीकरण रुम आणि रिकव्हरी रूमची व्यवस्था केली जाणार आहे. लाभार्थ्याची नोंदणी पोर्टलवर घेतल्यानंतर त्याला मोबाईलवर संदेश दिला जाईल. त्यानंतर लसीकरणाला सुरूवात होईल. म्हणजेच लाभार्थ्याच्या नाव नोंदणीपासून ते लसीनंतरच्या परिणामांपर्यंत सर्व शक्यतांची तपासणी या रंगीत तालिममध्ये होणार केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात देखील रंगीत तालिम होणार आहे. त्याचे नियोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे.

प्रत्यक्षात लस नाही

करोना प्रतिबंध लसीची ही रंगीत तालिम आहे. प्रत्यक्ष लसीकरण नाही, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे व जिल्हा परिषदेेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली. या तालिममधून यंत्रणेकडून काही चुका होतात, याचे निरीक्षण करायचे आहे. लाभार्थ्याच्या नाव नोंदणीपासून ते लसनंतर लाभार्थ्यावर होणार्या परिणामांची नोंदणी घ्यायची आहे. लाभार्थ्यावर काही परिणाम झाल्यास त्यादृष्टीने काय करता येईल, हे देखील या तालिममध्ये पाहिले जाणार आहे.