corona
corona
सार्वमत

श्रीरामपुरात रॅपिड टेस्ट; तिघे जण करोना बाधित

78 जणांची तपासणी; 75 निगेटिव्ह

Nilesh Jadhav

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने कोव्हिड 19 साठी येथील तत्काळ निदान तपासणी (रॅपिड टेस्ट) शिबिरात 78 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तिघे जण करोना पॉझिटिव्ह सापडले. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही या ठिकाणीच तात्काळ तपासणी करण्यात आली.

त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 45 वर पोहोचली आहे. श्रीरामपरातील पाच जण करोनामुक्त होवून काल घरी परतले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने येथील वॉर्ड क्र. 7 मध्ये सोशल क्लबच्या सभागृहात तत्काळ तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबिरात सहा आरोग्य कर्मचारी व दहा आशा सेविकांनी शिबिराला उपस्थित असलेल्या व्यक्तींची तपासणी केली. यावेळी नॉद्रर्न ब्रॅच ते सरस्वती कॉलनीपर्यंतच्या व्यक्तींनी हजेरी लावली.

यातील 78 व्यक्तींची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. त्यात तिघेजण करोना पॉझिटिव्ह निघाले. त्यात इंदिरानगर परिसरात राहणार्‍या ग्रामीण रुग्णालयातील एक कर्मचारी, दुसरा व्यक्ती कांदा मार्केट परिसरातील असून तिसरा महिला रुग्ण उदय पॅलेसच्यामागे राहणार्‍या आहेत. त्यांच्यावर येथील सेंट लुक रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या तिघा पॉझिटीव्ह रुग्णांच्या नातेवाईकांचीही तपासणी करण्यात येवून काहींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

शिबीर पार पडल्यानंतर याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांना देण्यात आली. त्यांनी आणखी रॅपिड टेस्टींगसाठी किट पाठविण्याची ग्वाही दिली आहे. अशा प्रकारे शहरातील इतर भागातही शिबिरे आयोजित केली जाणार आहे. त्यास नागरिकांनी उपस्थित राहून तपासणी करावी व आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.

येथील दळवी वस्ती भागात राहत असणारे ठेकेदाराचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक-दोन दिवस त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्यात गेले. त्यानंतर कुटुंबियांची तपासणी करण्यात येवून त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह सापडलेल्या ठेकेदाराच्या कारच्या चालकाचा तपासणीसाठी शोध घेण्यात आला मात्र तो सापडला नाही. त्याचा आज शोध घेऊन त्याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या कुटुंबियांनाही तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com