नेवासा तालुक्यात करोना संक्रमितांची संख्या 282 वर
सार्वमत

नेवासा तालुक्यात करोना संक्रमितांची संख्या 282 वर

Nilesh Jadhav

नेवासा शहरात 20 संक्रमित

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी रॅपिड अँटिजेन टेस्ट व खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात शहरातील 9 व्यक्ती तर बुधवारी 11 अशा दोन दिवसात 20 व्यक्ती संक्रमित आढळून आल्या तर तालुक्यात मंगळवारी 14 तर बुधवारी 18 असे 32 रुग्ण करोना संक्रमित आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली. तालुक्यातील रुग्णसंख्या त्यामुळे 282 वर गेली आहे.

मंगळवारी नेवासा येथील कोविड केअर सेंटर येथे 90 तर बुधवारी 104 व्यक्तींच्या रॅपिड चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये नेवासा शहरातील 20, सोनई येथील 4, धनगरवाडी येथील एक, चांदा येथील 5, नारायणवाडी व नेवासा बुद्रुक येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा अहवाल संक्रमित आला. तर 164 व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीमध्ये माळीचिंचोरे व मांडेगव्हाण येथील प्रत्येकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली. तालुक्यातील रुग्ण संख्या 282 वर गेली आहे. 180 रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. करोनाबाधितांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची आकडेवारी जवळपास तिप्पट आहे.

चांद्यातील बाधितांची संख्या 7 वर

चांदा | वार्ताहर | Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा येथे मंगळवारी एका57 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संबधीत हाय रिक्स परिसरात बुधवारी अ‍ॅटिजेन रॅपिड टेस्ट केली असता आणखी पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. रजनिकांत पुंड यांनी दिली.

दरम्यान मागील आठवडयात आढळून आलेला पहिला रुग्ण काल बरा होऊन घरी परतला. त्यामुळे ग्रामस्थांना थोडा दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी चांदयात एक महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानुसार संबंधीत क्षेत्रात डॉक्टरांचे पथक दाखल झाले. त्यांनी एकुण 25 जणांची तपासणी कोविड सेंटरमध्ये केली असता त्यामध्ये पाच जण बाधीत आढळुन आले. त्यांना त्यांना नेवासा कोविड सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असल्याची माहिती डॉ. पुंड यांनी दिली.

दोन दिवसात रुग्णामध्ये वाढ झाल्याने चांदा परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र नागरीकांनी घाबरून न जाता विनाकाम घराबाहेर पडू नका. तोंडाला मास्क लावा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा असे आवाहन डॉ. पुंड यांनी केले आहे.

सोनईत एकाच्या मृत्यूनंतर रॅपिड चाचण्या; पाच संक्रमित

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई येथे करोना संक्रमिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या घेतलेल्या चाचण्यांमध्ये मंगळवारी तिघेजण करोना संक्रमित आढळून आल्यानंतर काल बुधवारी धनगरवाडी येथील दोन व्यक्ती संक्रजमित आढळून आल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र कसबे यांनी दिली.

सोनई पोलीस ठाण्यात संबंधित 37 व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 2 व्यक्ती संक्रमित आढळून आल्या. काल मंगळवारी सायंकाळी सोनई येथील शेतकर्‍यांशी संबंधित असणार्‍या एका शासकीय कर्मचार्‍याचा तपासणी अहवाल संक्रमित आलेला आहे.

हे कर्मचारी अहमदनगर येथे राहायला असून सोनईत त्यांची नेमणूक होती व शेतकर्‍यांशी दैनंदिन संपर्क येत होता. त्यांनी नगरच्या एका खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्यांना करोना संक्रमण झालेले असल्याचे समजले असून त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांची स्वॅब तपासणी करण्यात येत आहे पॉझिटिव्ह व्यक्तींना कोविड सेंटरला पाठवल्याचे सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र कसबे यांनी सांगितले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com