यंदा 2600 कृषी निविष्ठा तपासण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट!

तयारी खरिपाची || मागील वर्षी तपासलेल्या बियाणे, खते आणि कीटक नाशकांची टक्केवारी 101 टक्के
यंदा 2600 कृषी निविष्ठा तपासण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दरवर्षी मे महिना सुरू झाला की कृषी विभागाची खरीप हंगामाची लगबग सुरू होते. यासाठी पेरणीचे क्षेत्र निश्चित करणे, खरीप हंगामातील पिकांचे क्षेत्र प्रस्तावित करणे, खते, बियाणे, किटक नाशकांची मागणी नोंदवून हंगामासाठी त्याचा पुरेसा पुरवठा करणे, प्रशासकीय पातळीवर वेगवेगळ्या यंत्रणांची बैठक घेऊन तयारी करण्यात कृषी विभाग व्यस्त असतो.

याचाच एक भाग म्हणून यंदा कृषी विभागाने शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये, त्यांना योग्य बियाणे, खते आणि कीटक नाशकांचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात बियाणे, रासायिक खते आणि किटकनाशकांची 2 हजार 589 नमुने तपासण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

नगर जिल्हा हा तसा अवर्षण प्रवण जिल्हा म्हणून ओळखला जातो. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर शेतकरी पेरण्या करतात. त्यानंतर भूरभूर पावसावर जिल्ह्यातील खरीप हंगाम कसाबसा तरून जातो. मात्र, अलिकडच्या दहा वर्षात हे चित्र बदलल्याचे दिसत आहे. 15 मार्चनंतर जिल्ह्यात अवकाळीला सुरूवात होऊन मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी होत असल्याने खरीप हंगामासाठी देखील आता कृषी विभाग सावध झाला आहे. यामुळे खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.

आता मागील वर्षीचा विचार केल्यास जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारी सोबतच कृषी विभागाने 2 हजार 540 कृषी निविष्ठांची तपासणी केली होती. त्यावेळी कृषी विभागाच्या नियोजनाच्या तुलनेत ही तपासणीची टक्केवारी ही 101 टक्के असल्याचे कृषी अहवालात नमुद करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात नगर मुख्यालयासह 14 तालुक्यात एक पूर्ण वेळ, 41 अर्धवेळ असे 42 गूणवत्ता नियंत्रण कृषी निविष्ठ निरिक्षक तपासणीसाठी उपलब्ध आहेत.

त्यांनी मागील वर्षी बियाणांच्या 1 हजार 141 निविष्ठांची तपासणी केली होती. त्यातील 33 नमुने अप्रामाणित घोषित करण्यात आले. यापैकी 25 कोर्ट केसेससाठी पात्र होते. 8 नमुने प्रशासकीय ताकीदपात्र होते. तर 8 प्रकरणात सक्त प्रशासकीय ताकीद देण्यात आली, 19 नमुन्यांवर कोर्टकेस दाखल करण्यात आली आणि 6 प्रकरणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

रासायनिक खतांच्या 664 नमुन्यांपैकी 43 नमुने प्रमाणित घोषित करण्यात आले. यातील 41 नमुने कोर्ट केसेससाठी पात्र करण्यात आले तर 2 नमुने यांना प्रशासकीय सक्त ताकीद देण्यात आली. कोर्टकेसेसपैकी 18 उत्पादकांनी विभागयी कृषी सहसंचालक यांच्याकडे अपिल केलेले आहेत. उर्वरित 23 वर कार्यवाही सुरू असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमुद आहे. किटकनाशकाच्या 462 नमुन्यांपैकी 7 नमुने अप्रमाणित करण्यात आले असून यातील दोन उत्पादकांनी पुर्नविश्लेषणासाठी न्यायालयात दावा दाखल केलेला आहे.

उर्वरित पाच प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी बियाणे आणि किटक नाशके यांच्या एकही परवाना रद्द अथवा निलंबित करण्यात आलेला नाही. केवळ खतांचे 21 परवाने निलंबित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील बियाणे तक्रार निवारण समितीकडे मागील वर्षी 22 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तपासूण त्याचा अहवाल संबंधीत शेतकर्‍यांना पाठवण्यात आल्याचा दावा कृषी विभागाने केलेला आहे.

यंदाचे तपासणीचे असे नियोजन

जिल्हा कृषी अधिक्षक 9, कृषी उपसंचालक 25, उपविभागीय कृषी अधिकारी 120, तंत्र अधिकारी 176, तालुका कृषी अधिकारी 490, जिल्हा गुणनियंत्रक निरिक्षक 319, राज्य स्तरीय निरिक्षक 1 हजार 139, कृषि विकास अधिकारी 44, मोहिम अधिकारी जिल्हा परिषद 115, जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद 94, कृषी अधिकारी पंचायत समिती 1 हजार 145, जिल्हास्तर निरिक्षक 1 हजार 589 असे एकूण 2 हजार 589 नमुने तपासणीचे उद्दिष्टे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com