25 हजार विद्यार्थ्यांना मिळेनात कोणतेच शिक्षण

झेडपीचा अहवाल : करोनामुळे शाळा बंद असल्याचा फटका
शिक्षण
शिक्षण

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील तब्बल 25 हजार 500 विद्यार्थ्यांना अद्यापही ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे कोणतेही शिक्षण मिळत नसल्याने

ते शिक्षणापासून कोसोदूर आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मागील पंधरा दिवसांच्या अहवालातून हे चित्र समोर आले आहे. करोना संसर्ग संपून शाळा कधी सुरू होणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष आहे.

गत मार्च महिन्यांपासून करोना लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या व शहरी भागात महानगरपालिकेच्या, तसेच इतर सर्वच खासगी शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देत आहेत. तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षणाची साधने नसल्यास शिक्षक ऑफलाइन शिक्षणाची सोय करत आहेत. सध्या करोनामुळे शाळा बंद आहेत. परंतु या काळातही पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण सुरू राहण्याच्या अनुषंगाने कार्यरत राहायचे असल्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

ऑनलाईन वर्ग घेताना किती शिक्षक झूम किंवा गुगल मीट वापरतात, किती शिक्षक व्हॉटसअ‍ॅप ग्रुप, दीक्षा अ‍ॅप, लिंक व्हीडिओ किंवा ऑनलाईन टेस्टद्वारे अध्यापन करतात? ऑनलाईन शक्य नाही तेथे आठ-पंधरा दिवसांचा अभ्यास लिहून (हार्डकॉपी) मुलांना दिला का? विद्यार्थी-पालक यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना अभ्यासक्रम दिला का? किती विद्यार्थी ऑॅनलाईन शिक्षण घेत आहेत? विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन साधने आहेत का? तसेच किती विद्यार्थ्यांकडे साधने नाहीत अशी माहिती दर आठवड्याला सादर करावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले होते. त्यानूसार पाच महिन्यांपासून असा अहवाल मागवला जात आहे. नोव्हेंबर महिन्यांतील पहिल्या आठवड्याचा अहवाल शिक्षण विभागास प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात 25 हजार 500 विद्यार्थ्यांना सध्या कोणतेच शिक्षण मिळत नाही. यात जिल्हा परिषद शाळांचे 4 हजार 600, तर इतर शाळांचे 20 हजार 900 विद्यार्थी आहेत. तर गेल्या तीन आठवड्यांपासून शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु यासाठी विद्यार्थ्यांची नगण्य हजेरी आढळत आहे. मागील आठवड्यात नववी ते बारावीचे एकूण 2 लाख 85 हजार विद्यार्थ्यांपैकी अवघे नऊ हजार विद्यार्थी उपस्थित राहत होते.

...............

63 शिक्षक रिकामेच

जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे 11 हजार 529, तर इतर व्यवस्थापन शाळांचे 20 हजार 623 असे एकूण 32 हजार 152 शिक्षक आहेत. त्यापैकी 63 शिक्षक सध्या कोणतेही अध्यापक करत नाहीत. उर्वरित सर्व शिक्षक ऑनलाईन, ऑफलाईन किंवा इतर मार्गाने अध्यापनाचे काम करतात, असे या अहवालात नमूद आहे.

.................

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com